कोटात आत्महत्येचे सत्र सुरुच; 8 महिन्यात 23 आत्महत्या, मंगळवारी मुलीने संपवले आयुष्य...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 14:33 IST2023-09-13T14:32:15+5:302023-09-13T14:33:05+5:30
कोचिंग क्लासेससाठी लोकप्रिय असलेले राजस्थानमधील कोटा शहर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे चर्चेत आले आहे.

कोटात आत्महत्येचे सत्र सुरुच; 8 महिन्यात 23 आत्महत्या, मंगळवारी मुलीने संपवले आयुष्य...
कोटा: राजस्थानमधील कोटा शहर NEET-JEE परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खुप लोकप्रिय आहे. पण, गेल्या काही महिन्यांपासून हे शहर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येसाठी चर्चेत आले आहे. गेल्या आठ महिन्यांत येथे 23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील 23 वी आत्महत्या मंगळवारी घडली. NEET ची तयारी करण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थ्यीनीने आत्महत्या केली आहे. ही मुलगी अवघ्या पाच महिन्यांपूर्वी येथे अभ्यासाठी आली होती.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. रिचा सिन्हा(16), असे या मुलीचे नाव असून, ती झारखंडची रहिवासी होती. विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यासोबतच पोलिसांनी या घटनेमागील कारणांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी कोटामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या वर्षभरात 23 विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
विज्ञान नगर पोलिस स्टेशनचे एएसआय अमर कुमार यांनी सांगितले की, रिचा पाच महिन्यांपूर्वी NEET च्या तयारीसाठी कोटा येथे आली होती. ती इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लेक्स येथील हॉस्टेलमध्ये राहायची. इतर मुलींनी सांगितले की, रिचा मंगळवारी संध्याकाळपासून खोलीतून बाहेर आली नव्हती. संशयावरुन बुधवारी सकाळी दरवाजा तोडण्यात आला, तेव्हा रिचाने आत्महत्या केल्याचे उघड झाले. यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडल्याचे पोलिसांनी सांगितले.