"दर ५ वर्षांनी पराभव का होतो, कळत नाही...", काँग्रेस नेते सचिन पायलट यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 01:47 PM2023-12-21T13:47:33+5:302023-12-21T13:53:37+5:30

आम्ही प्रत्येक वेळी खूप मेहनत करतो, पण दर पाच वर्षांनी पराभव का होतो, ते कळत नाही, असे सचिन पायलट म्हणाले.

congress leader sachin pilot rajasthan election result | "दर ५ वर्षांनी पराभव का होतो, कळत नाही...", काँग्रेस नेते सचिन पायलट यांची प्रतिक्रिया

"दर ५ वर्षांनी पराभव का होतो, कळत नाही...", काँग्रेस नेते सचिन पायलट यांची प्रतिक्रिया

टोंक : राजस्थानमध्ये दरवेळेप्रमाणे यावेळीही प्रथा कायम ठेवून सत्तापरिवर्तन झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजपाने आपले सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, या विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही प्रत्येक वेळी खूप मेहनत करतो, पण दर पाच वर्षांनी पराभव का होतो, ते कळत नाही, असे सचिन पायलट म्हणाले.

बुधवारी टोंकमध्ये आपल्या विधानसभा मतदारसंघातील लोकांप्रती सचिन पायलट यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी, सचिन पायलट म्हणाले, केवळ सभागृहाच्या आत आणि बाहेर नवीन सरकारची जबाबदारी सांगणार नाही, तर मजबूत विरोधी पक्षाची भूमिकाही बजावणार आहे. तसेच, निवडणुकीपूर्वी भाजपाचे अनेक मोठे नेते दिल्लीहून राजस्थानमध्ये आले होते. त्या नेत्यांनी राज्यातील जनतेला मोठमोठी आश्वासने दिली होती. त्यामुळे आम्ही त्यांना आश्वासने पूर्ण करण्यास सांगू. नवीन सरकार अजूनही आपले मंत्रिमंडळ स्थापन करू शकले आहे, परंतु आम्ही त्यांची जबाबदारी निश्चित करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही, असे सचिन पायलट यांनी सांगितले.

यादरम्यान, सभेला संबोधित केल्यानंतर सचिन पायलट यांनी आपला मुद्दा मांडला आणि विरोधी पक्षात बसूनही आपण कमजोर होणार नाही, कारण यावेळी आम्ही ७० च्या संख्येने विजयी झालो आहोत, असे सांगितले. दरम्यान, सचिन पायलट हे काँग्रेसच्या पराभवाचे दुःख गावकऱ्यांपासून लपवू शकले नाहीत. सचिन पायलट गावकऱ्यांसमोर म्हणाले की, "आम्ही दरवर्षी मेहनत करतो. पण का पराभव झाला माहीत नाही. यावेळी आम्हाला विजयाची पूर्ण अपेक्षा होती, पण त्याचा निकाल असा आला की आम्ही पराभूत झालो."

भजनलाल शर्मा यांच्याकडे राज्याची कमान 
राजस्थान विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपाने नवे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांच्याकडे राज्याची कमान सोपवली आहे. पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. तसेच भाजपाने राज्यात दोन नवीन उपमुख्यमंत्र्यांचीही नियुक्ती केली आहे. दिया कुमारी आणि प्रेमचंद्र बैरवा यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. या निवडणुकीत भाजपाने ११५ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला केवळ ६९ जागा मिळाल्या होत्या.  

Web Title: congress leader sachin pilot rajasthan election result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.