मुंबई-गोवा महामार्गावर तब्बल ३ तास वाहतूक कोंडी; वडखळ-कोलाडदरम्यान वाहनांच्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 07:05 IST2025-05-11T07:05:19+5:302025-05-11T07:05:50+5:30
एक तासाच्या प्रवासासाठी तब्बल तीन तासांचा वेळ खर्ची करावा लागला.

मुंबई-गोवा महामार्गावर तब्बल ३ तास वाहतूक कोंडी; वडखळ-कोलाडदरम्यान वाहनांच्या रांगा
अनिल पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, नागोठणे : मुंबई-गोवामहामार्गावर वडखळ-कोलाडदरम्यान शनिवारी पहाटे साडेपाचपासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे एक तासाच्या प्रवासासाठी तब्बल तीन तासांचा वेळ खर्ची करावा लागला.
मे महिन्याच्या सुटीबरोबरच शनिवार-रविवारला जोडून सोमवारी बुद्ध पौर्णिमेची सुटी आणि लग्नसराईमुळे मुंबई-गोवामहामार्गावरील वाहनांची संख्या अचानक वाढली. वडखळपासून आमटेमपर्यंत कासवगतीने वाहतूक सुरू होती. आमटेम ते कोलेटीदरम्यान वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर लांब रांगा लागल्या होत्या. याठिकाणची वाहतूक जिल्हा वाहतूक पोलिस व महामार्ग वाहतूक पोलिसांना तीन तासांनंतर सुरळीत करण्यास यश आले.
निडी ते नागोठणे फाटा येथे सकाळी ८ वाजल्यापासून बेशिस्त वाहन चालकांमुळे पुन्हा वाहतूक कोंडी झाली. येथेही वाहनांच्या सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी जिल्हा वाहतूक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने चार तासांनी १२ वाजता महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली. यामुळे वडखळ-कोलाड या तासाभराच्या प्रवासाला तीन तास लागल्याने प्रवाशांची दमछाक झाली.
चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, वाहनांची वाढली संख्या
मुंबई-गोवा महामार्गावर अनेक भागांत चौपदरीकरणाचे काम अपूर्ण आहे. यामुळे वाहनांची संख्या वाढलेली असताना काही बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी होते. विशेषतः सणासुदीचा काळ आणि सुट्यांदरम्यान ही समस्या अधिक तापदायक ठरते.