रखडलेल्या पाणी प्रकल्पांना अखेर मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 12:46 AM2020-05-24T00:46:18+5:302020-05-24T00:47:02+5:30

जिल्हाधिकाऱ्यांची स्वयंसेवी संस्थांना विशेष परवानगी

Stagnant water projects finally approved | रखडलेल्या पाणी प्रकल्पांना अखेर मंजुरी

रखडलेल्या पाणी प्रकल्पांना अखेर मंजुरी

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच काही स्वंयसेवी संस्थादेखील याप्रश्नी प्रशासनाला सहकार्य करत आहेत. गेले दोन महिने लॉकडाउनमुळे सर्वच कामांना ब्रेक लागला होता. मात्र, पावसाळ्यापूर्वी कामांना गती देणे गरजेचे असल्याने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काही स्वयंसेवी संस्थांना विशेष परवानगी दिली आहे. त्यामुळे सात तालुक्यांतील २१ ठिकाणी पाणी प्रकल्पांना हिरवा कंदील मिळाल्याने सामाजिक अंतर राखून कामांना सुरुवात करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये दरवर्षी सुमारे साडेतीन हजार मिमी पावसाची नोंद होते. मोठ्या संख्येने पाऊस पडूनही योग्य नियोजनाअभावी सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे डिसेंबरपासूनच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैलांची पायपीट करावी लागते. काही ठिकाणचे जलस्रोत अशुद्ध झाल्याने ग्रामस्थांना तेच पाणी पिण्यावाचून पर्याय नसतो. ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याचीही वेळ येत असल्याने प्रशासनाविरोधात मोर्चे, आंदोलने छेडली जातात.

प्रशासकीय पातळीवरून पाण्यासाठी दरवर्षी विविध योजना आखल्या जातात. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, पाणी योजना काही पूर्ण होत नाहीत. जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाण्याची समस्या सोडवण्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत. स्वदेश फाउंडेशननेही जिल्ह्यात काम सुरू केले आहे; परंतु कोरोनामुळे ठप्प झाले होते. लॉकडाउनमध्ये पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी प्रकल्प राबवण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्वदेश फाउंडेशनला विशेष परवानगी दिली आहे. महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, माणगाव, तळा आणि सुधागड या सात तालुक्यांमधील पाणी प्रकल्पाची कामे सुरू करण्यात आली आहेत. या कामांमध्ये प्रामुख्याने पाण्याच्या उद्वभवाचे काम पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जात आहे.

पावसाळ्यापूर्वी योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न

काम करताना १२१ कामगारांची योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. दिवसातून तीन वेळा कामगारांचे थर्मल स्कॅनिंग करणे, मास्क वापरणे बंधनकारक आहे. सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे. ठरावीक काळानंतर प्रत्येक कामगाराने हात धुणे किंवा सॅनिटायझर वापरणे बंधनकारक आहे.

सात तालुक्यांमधील २१ ठिकाणी पाणी प्रकल्पाची कामे सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त पाणी योजना प्रशासनाच्या सहकार्याने प्रत्यक्ष कार्यान्वित करण्याचा स्वदेश फाउंडेशनचा प्रयत्न आहे, अशी माहिती स्वदेशचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला यांनी दिली.

जिल्ह्यातील पाण्याशी संबंधित प्रकल्प पावसाळ्यापूर्वी मार्गी लागणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही स्वदेश फाउंडेशनला परवानगी दिली आहे. त्यांनी कोरोनाबाबतचे सर्व नियमांचे पालन करून काम करणे गरजेचे आहे. कामे करणाºया अशा अन्य स्वयंसेवी संस्थांना परवानगी देऊ शकतो; पशू कल्याण, अन्न वितरण, जलसंधारण, आदिवासींची आरोग्य तपासणी या उपक्रमांनाही परवानगी दिली आहे.
- निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड.

Web Title: Stagnant water projects finally approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.