शिवप्रेमींमध्ये जल्लोष, सर्वत्र शिवाजी महाराजांचा जयजयकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 12:42 AM2020-02-20T00:42:19+5:302020-02-20T00:42:30+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराजाचा विस्तार ज्या राजधानीच्या ठिकाणावरून केला

Shout praises to Shivaji Maharaj everywhere | शिवप्रेमींमध्ये जल्लोष, सर्वत्र शिवाजी महाराजांचा जयजयकार

शिवप्रेमींमध्ये जल्लोष, सर्वत्र शिवाजी महाराजांचा जयजयकार

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. जय भवानी... जय शिवाजी...! या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला. ढोलताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकांमुळे जिल्हा ‘शिवमय’ झाला होता. मिरवणुकीमध्ये मुस्लीम बांधवांनी भगवे फेटे बांधून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यामुळे ंिहंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडले. किल्ले रायगडावर बुधवारी सकाळपासूनच छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींनी गर्दी केली होती. जिल्ह्यात अनेक ठिकाणी सायंकाळी निघालेल्या मिरवणुकाही लक्षवेधी ठरल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराजाचा विस्तार ज्या राजधानीच्या ठिकाणावरून केला, त्या रायगड जिल्ह्यात बुधवारी मोठ्या शांततामय वातावरणात शिवजयंती साजरी झाली. अलिबाग येथील कुलाबा किल्ल्यात सकाळपासून शिवप्रेमींच्या रांगा लागल्या होत्या. समुद्राला भरती असतानाही या शिवप्रेमींनी ओहोटीची वाट न पाहता शिवघोषणा देत किल्ल्यात प्रवेश केला. याचप्रमाणे रायगडमधील गडकिल्ल्यांवर शिवप्रेमींचा दिवसभर राबता होता. अलिबाग, मुरुड, रोहा येथील युवा मंडळांनी साजरा केलेला शिवजयंती उत्सव विशेष लक्षणीय ठरला. जिल्ह्यात साजऱ्या झालेल्या उत्सवास मराठी परंपरा आणि संस्कृतीची झालर दिसत होती. अलिबाग नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले.

पारंपरिक पोशाख
शिवजयंतीनिमित्त अभिवादनासह आपल्या राजाबद्दल असलेले प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी तमाम शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. हातात शिवध्वज, भगवे फेटे, भगवे जॅकेट, भगवा कुर्ता परिधान केलेल्या युवकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. मात्र, यात अबालवृद्ध
पुरु षांसह महिलाही मागे नव्हत्या. नऊवारी, नाकात नथ आणि डोक्यावर भगवा फेटा अशा पारंपरिक पेहरावात महिलांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

महाडमध्ये शिवजयंती उत्साहात
महाडमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाड नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी सर्व सभापती, नगरसेवक अधिकारी उपस्थित होते. प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्यासह विविध शासकीय अधिकारी यांनीही शिवरायांना अभिवादन केले. शिवजयंतीनिमित्त राज्यभरातून किल्ले रायगडावर शिवभक्तांनी आणलेल्या शिवज्योतींचे शिवाजी चौकात नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी स्वागत केले. या वेळी शिवघोषांनी महाड शहर दुमदुमून गेले होते. तालुक्यातील अनेक गावांत तसेच शासकीय कार्यालयांतही शिवजयंती साजरी करण्यात आली. लोकविकास प्रतिष्ठानतर्फे शिवाजी महाराज चौकात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यानिमित्त शिवाजी चौकात नगरपरिषदेने रोषणाई केली होती.


शिस्तप्रियतेचे दर्शन
कोणताही उत्सव साजरा करताना रायगडकर शिस्तीचे पालन करतात. त्याचप्रमाणे आजच्या शिवजयंतीनिमित्ताने रायगडकरांनी शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू न देता उत्सव साजरा केला. शिवजयंती साजरी करणाºया मंडळींनी आधीच पोलिसांकडे रीतसर परवानग्या घेतल्या होत्या. मिरवणूक उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जिल्हा पोलीस विभागाकडून ६१ पोलीस अधिकारी, ४२५ पोलीस कर्मचारी, ४ दंगल नियंत्रण पथकांची नेमणूक करण्यात आली होती.

बोर्ली पंचतनमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन विभागातील मावळा संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती थाटामाटात साजरी झाली. बोर्ली पंचतन होळीचे पटांगणाहून महाराजांचा पुतळा ठेवून सजविलेला रथ, तसेच तरुणांची मोटरसायकल रॅली व महाराजांच्या जयघोषाने बोर्ली पंचतन गाव दुमदुमून गेले होते. ही रॅली बोर्ली पंचतन येथून सुरू होऊन कापोली, शिस्ते, वडवली, दिवेआगर, वाळवटी चिखलप मार्गे श्रीवर्धन येथील पेशवे मंदिर येथे या रॅलीची सांगता करण्यात आली. या वेळी मावळा संघटनेचे अध्यक्ष निखिल कांबळे, उपाध्यक्ष अनिल पांगारे, सचिव सुमित सावंत, खजिनदार कौशल वाणी आदी पदाधिकारी, सदस्यांसह शिवभक्त उपस्थित होते. बोर्ली पंचतन, वडवली, दिवेआगर, शिस्ते, कापोली या गावातील सुमारे ५०० ते ६०० मोटरसायकलस्वार तरुण-तरुणी यामध्ये सहभागी झाले होते. महिलांचादेखील उत्साह दांडगा होता.

Web Title: Shout praises to Shivaji Maharaj everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड