-मधुकर ठाकूर, उरण
रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक सिंहासन स्थळाच्या संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई मंडळाकडून वेगाने सुरू असून, येत्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यापूर्वी ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सुमारे ११ कोटी रुपयांच्या खर्चातून हे काम सुरू आहे.
सिंहासनाच्या मूळ अधिष्ठानाचे अवशेष पर्यटकांना स्पष्टपणे पाहता यावेत यासाठी समोरील भागात पारदर्शी काच बसविण्यात येणार असून, विशेष प्रकाशयोजनाही केली जाणार आहे. रायगड किल्ल्याचे संरक्षक व भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी राजेश दिवेकर यांनी ही माहिती दिली.
...म्हणून नव्याने संवर्धन मोहीम घेतली हाती
रायगडावरील सिंहासन, राजसदर आणि राज्याभिषेकाशी संबंधित वास्तूंचे संवर्धन भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून अनेक वर्षांपासून टप्प्याटप्प्याने सुरू आहे. १९५३-५४ मध्ये सिंहासन परिसर, राजसदर आणि नगारखान्याच्या दुरुस्तीचे पहिले मोठे काम करण्यात आले होते.
त्यावेळी मूळ वास्तूचे अवशेष जतन करत परिसराचे मजबुतीकरण करण्यात आले होते. मात्र, कालांतराने प्रतिकूल हवामानामुळे सिंहासन परिसरातील सिमेंट, विटांचे बांधकाम आणि लोखंडी संरचना कमकुवत झाल्या. त्यामुळे विद्यमान बांधकाम विद्रूप दिसू लागल्याने नव्याने संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाचे मुंबई विभागीय अधीक्षक डॉ. अभिषेक आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे.
निधीअभावी संवर्धन रखडले
२०१८ मध्ये राज्य शासनाकडून भारतीय पुरातत्त्व विभागाला ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. त्यापैकी बहुतांश निधी खर्च झाला असून, काही कामे अंतिम टप्प्यात आहेत.
रायगडावरील मनोरे, बाजारपेठ, होळीचा माळ, शिपायांची निवासस्थाने, राजदरबार, नगारखाना, राणीवसा, दारूकोठार आणि हत्तीखान्यातील वस्तुसंग्रहालयाच्या संवर्धनासाठी अतिरिक्त ३० कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. मात्र, निधी मंजुरीला विलंब होत असल्याने शिवप्रेमींमधून संताप व्यक्त केला आहे.
Web Summary : Raigad fort's Shivaji Maharaj throne restoration progresses rapidly, aiming completion before Shivrajyabhishek Day. The project, costing ₹11 crore, includes transparent glass and special lighting to showcase the original platform.
Web Summary : रायगढ़ किले में छत्रपति शिवाजी महाराज के सिंहासन का जीर्णोद्धार कार्य तेजी से चल रहा है, जिसका लक्ष्य शिवराज्याभिषेक दिवस से पहले पूरा करना है। 11 करोड़ रुपये की परियोजना में मूल मंच को प्रदर्शित करने के लिए पारदर्शी कांच और विशेष प्रकाश व्यवस्था शामिल है।