पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, आता सर्वोच्च न्यायालयानेही आपल्या कामकाजाच्या पद्धतीत मोठा बदल केला आहे. सुप्रीम कोर्टाने आठवड्यातून दोन दिवस 'वर्क फ्रॉम होम' आणि व्हर्च्युअल सुनावणीचा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयानुसार, आता सोमवार आणि शुक्रवारी बहुतांश प्रकरणांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली जाईल. या दोन दिवसांत न्यायाधीश आपल्या घरून अथवा ठरवून दिलेल्या ठिकाणांवरून ऑनलाइन पद्धतीने खटले चालवतील. याशिवाय, मंगळवार, बुधवार आणि गुरुवारीचे कामकाज 'हायब्रीड मोड'मध्ये चालेल. येथे वकिलांना प्रत्यक्ष अथवा ऑनलाइन पद्धतीनेही उपस्थित राहण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
न्यायाधीशांसाठी 'कार पूलिंग'ला प्रोत्साहन देण्याचा निर्णय -
महत्वाचे म्हणजे, केवळ सुनावणीच्या पद्धतीतच नव्हे, तर न्यायाधीशांच्या प्रवासाच्या पद्धतीतही मोठा बदल करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीशांसाठी 'कार पूलिंग'ला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, प्रदूषण कमी होण्यास आणि इंधन बचत होण्यासही मोठी मदत होईल. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळासह राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि नागरिकांनाही इंधन बचतीचे आवाहन केले आहे. आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेही यादृष्टीने निर्णय घेतला आहे.
त्रिपुरा सरकारचा पुढाकार आणि जागतिक ऊर्जा संकट
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयापूर्वी, त्रिपुरा सरकारनेही आपल्या राज्यात ५० टक्के 'वर्क फ्रॉम होम' लागू करून आदर्श निर्माण केला आहे. दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांमुळे संपूर्ण जगात ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' हा जगातील तेल आणि वायू वाहतुकीचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. यावर इराणने नाकेबंदी केली आहे. यामुळे अनेक देशांची जहाजे अडकून पडली आहेत. या भीषण परिस्थितीत भारताला संभाव्य तेल संकटापासून वाचवण्यासाठी, पंतप्रधान मोदी यांनी सरकारी आणि खाजगी कंपन्यांना 'वर्क फ्रॉम होम' संस्कृतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.
Web Summary : Responding to PM Modi's appeal, the Supreme Court embraces 'work from home' two days a week and encourages judges to carpool, aiming to conserve fuel and reduce congestion, following Tripura's lead amid global energy concerns.
Web Summary : पीएम मोदी की अपील पर प्रतिक्रिया देते हुए, सुप्रीम कोर्ट ने सप्ताह में दो दिन 'वर्क फ्रॉम होम' अपनाया और न्यायाधीशों को कारपूलिंग के लिए प्रोत्साहित किया, जिसका उद्देश्य त्रिपुरा के नेतृत्व के बाद वैश्विक ऊर्जा चिंताओं के बीच ईंधन का संरक्षण और भीड़ को कम करना है।