1 / 6नवा कोरा स्मार्टफोन खरेदी करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. जसा नवा फोन हातात येतो, तसा आपण उत्साहाच्या भरात तो वापरू लागतो आणि काही दिवसांनी त्याचा रिकामा डबा भंगार किंवा निरुपयोगी समजून कचऱ्यात फेकून देतो. 2 / 6पण, तुम्ही कधी विचार केला आहे का, की हा रिकामा डबा भविष्यात तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवू शकतो? होय, स्मार्टफोनचा बॉक्स केवळ पॅकेजिंगसाठी नसून त्याचे अनेक छुपे आणि मोठे फायदे आहेत, जे सामान्य युजर्सना माहित नसतात.3 / 6स्मार्टफोनच्या बॉक्सवर फोनशी संबंधित अत्यंत गोपनीय आणि महत्त्वाची माहिती असते. यामध्ये IMEI नंबर, सिरियल नंबर आणि मॉडेल डिटेल्स यांचा समावेश असतो. समजा तुमचा फोन कधी चोरीला गेला किंवा हरवला, तर पोलिसात तक्रार करण्यासाठी किंवा फोन ब्लॉक करण्यासाठी सर्वात आधी 'IMEI' नंबरची गरज असते. जर तुमच्याकडे बॉक्स असेल, तर ही माहिती सहज मिळते. याशिवाय, फोन वॉरंटीमध्ये असताना रिपेअर करायचा असेल, तरीही सर्व्हिस सेंटरमध्ये बॉक्सवरील डिटेल्स खूप कामी येतात.4 / 6अनेक जण जुना फोन विकून नवा फोन घेतात. जेव्हा तुम्ही तुमचा जुना फोन त्याच्या मूळ बॉक्स आणि ॲक्सेसरीजसह विकायला काढता, तेव्हा खरेदीदाराचा तुमच्यावर विश्वास वाढतो. सेकंड हँड मार्केटमध्ये बॉक्स असलेल्या फोनला चांगली किंमत मिळते. बॉक्स असणे हे दर्शवते की फोन चोरीचा नाही आणि तो काळजीपूर्वक वापरला गेला आहे. यामुळे तुमच्या फोनची रीसेल व्हॅल्यू लक्षणीय वाढते.5 / 6घरातील जुने चार्जर, डेटा केबल, इयरफोन किंवा सिम इजेक्ट टूल अनेकदा इकडेतिकडे हरवतात. अशा वेळी फोनचा बॉक्स या छोट्या वस्तूंना व्यवस्थित एका ठिकाणी ठेवण्यासाठी उत्तम 'स्टोरेज' म्हणून काम करतो. तसेच, जर तुम्हाला एखादा जुना फोन काही काळासाठी वापरायचा नसेल, तर तो बॉक्समध्ये पॅक करून ठेवल्यास धूळ आणि ओलसरपणापासून सुरक्षित राहतो.6 / 6जर तुम्हाला तुमचा जुना फोन घरातील कोणाला किंवा मित्राला भेट द्यायचा असेल, तर तो ओरिजनल बॉक्समध्ये दिल्यास त्याचा लूक अतिशय प्रीमियम वाटतो. याशिवाय, थोडे क्रिएटिव्ह डोकं चालवून या कडक बॉक्सला छोटे कट मारून तुम्ही त्याचा अप्रतिम 'मोबाईल किंवा टॅब्लेट स्टँड' बनवू शकता. व्हिडिओ कॉलिंग किंवा चित्रपट पाहताना हा स्टँड मोफत आणि दर्जेदार पर्याय ठरतो.