रोहा रस्त्याचे जनआंदोलन स्थगित; पोलिसांची मध्यस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 11:47 PM2020-11-08T23:47:42+5:302020-11-08T23:47:54+5:30

रस्त्याची लवकर दुरुस्ती करण्याची मागणी

Roha road agitation postponed; | रोहा रस्त्याचे जनआंदोलन स्थगित; पोलिसांची मध्यस्थी

रोहा रस्त्याचे जनआंदोलन स्थगित; पोलिसांची मध्यस्थी

Next

रायगड : अलिबाग, रामराज, रोहा या रस्त्याची जलद सुधारणा होऊन जनतेचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा, याकरिता वरंडे सरपंच सुधीर चेरकर यांच्या नेतृत्वात सोमवारी रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले होते. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

आंदोलनाची जय्यत तयारीही करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांनी रविवारी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांच्यासमवेत आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन यशस्वी मध्यस्ती केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने ३० नोव्हेंबर, २०२० पर्यंत रस्त्याचे जलद व दर्जेदार काम केले जाईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर, आंदोलनकर्त्यांनी एकमताने ९ नोव्हेंबर रोजी होणारा रास्ता रोको तात्पुरता स्थगित केला.

अलिबाग रामराज रोहा मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. ३० ते ३५ वर्षांहून अधिक काळ या मार्गावरून नागरिक व वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्याची दुरवस्था चव्हाट्यावर मांडली. या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना असह्य त्रास सोसावा लागत असून, रुग्ण व गर्भवती महिलांचे अतोनात हाल होत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनातील अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना आंदोलनकर्त्यांनी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करायला लावून दुरवस्था दाखवून दिली. यावेळी आंदोलनकर्ते सरपंच सुधीर चेरकर, ॲड.मधुकर वाजंत्री, प्रकाश गायकर, गिरीश तेलगे, प्रणित पाटील, सुधाकर शेळके, प्रकाश नथु भांजी, अरुण भगत आदींसह ग्रामस्थ, प्रवाशी  उपस्थित होते.

Web Title: Roha road agitation postponed;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.