Raigad Crime: पतीच्या हत्येसाठी इन्स्टाग्रामवर अकाऊंट, कृष्णाला बस स्टॅण्डवर भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंड, मैत्रिणीच्या मदतीने काढला काटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 16:17 IST2025-10-16T16:15:23+5:302025-10-16T16:17:16+5:30
Raigad Crime News: एका १९ वर्षीय विवाहितेने विवाहबाह्य संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीची जंगलात नेऊन हत्या केली. या घटनेने रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Raigad Crime: पतीच्या हत्येसाठी इन्स्टाग्रामवर अकाऊंट, कृष्णाला बस स्टॅण्डवर भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंड, मैत्रिणीच्या मदतीने काढला काटा
Raigad Crime: लग्नानंतर तिचे एका तरुणासोबत सूत जुळले. त्यांच्यात संबंध प्रस्थापित झाल्यानंतर तिने अडसर ठरत असलेल्या पतीच्या हत्येचा प्लॅन बनवला. बॉयफ्रेंड आणि मैत्रिणीच्या मदतीने तिने इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट सुरू केलं. त्यावरून ती पतीशीच बोलत होती. त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि एक दिवस भेटायला बोलावलं. भेटायला आलेल्या पतीचे अपहरण करून जंगलात नेले आणि तिथेच त्याची हत्या केली. ही घटना घडली आहे रायगड जिल्ह्यातील नागोठणेमध्ये.
कृष्णा नामदेव खंडवी (वय २३, रा. गौळवाडी, पेण) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दिपाली अशोक निरगुडे (वय १९) असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. दिपालीचे २१ वर्षीय उमेश सदू महाकाळ यांच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. तर हत्येसाठी मदत करणाऱ्या मैत्रिणीचे नाव सुप्रिया चौधरी असे आहे.
पती पत्नीचे संबंध ताणले अन्...
कृष्णा खंडवी आणि दिपाली निरगुडे यांचा विवाह झाला. पण, लग्नानंतर काही महिन्यातच दोघांमधील संबंध ताणले गेले. पती-पत्नीचे बिनसले आणि त्याच काळात दिपालीची उमेश महाकाळशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. दोघांमध्ये बोलणं सुरू झालं आणि नंतर त्यांचे प्रेमसंबंध जुळले.
पायल वारगुडे नावाने इन्स्टाग्रामवर अकाऊंट
दिपाली आणि उमेशच्या प्रेमसंबंध कृष्णामुळे अडसर निर्माण होऊ लागला. त्यानंतर दोघांनी हत्येचा कट रचला. दिपाली आणि उमेशला या कामासाठी सुप्रिया चौधरी हिनेही मदत केली. त्यांनी पायल वारगुडे नावाने इन्स्टाग्रामवर एक अकाऊंट सुरू केलं.
त्या अकाऊंटवरून त्यांनी कृष्णाशी संपर्क केला. कृष्णाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा त्यांचा प्लॅन यशस्वी ठरला. त्यानंतर १० ऑक्टोबर रोजी कृष्णाला इन्स्टाग्रामवर मेसेज केला आणि भेटायला बोलावले.
नागोठणे बस स्टॅण्डवर कृष्णाला येण्यास सांगितले. तिथे आल्यानंतर कृष्णाशी गोड बोलत सुप्रिया त्याला वासगावच्या जंगलात घेऊन गेली. तिथे दिपाली आणि उमेशही पोहोचले. त्यानंतर तिघांनी त्याचा ओढणीने गळा आवळून हत्या केली.
ओळख पटू नये म्हणून चेहरा केला विद्रुप
कृष्णाची हत्या केल्यानंतर त्यांनी मृतदेह जंगलात पडू दिला. कृष्णाच्या मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्यांनी त्याच्या चेहऱ्यावर केमिकल टाकले. त्यामुळे त्याचा चेहरा विद्रुप झाला. तिघांनी कृष्णाचा मोबाइलही फोडला आणि फेकून दिला.
कृष्णा बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली. नागोठणे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज बघितले, त्याचबरोबर त्याच्या मोबाईलवर आलेले कॉल आणि इतर तांत्रिक गोष्टीही शोधल्या. त्यानंतर पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. या प्रकरणात पोलिसांनी मयताची पत्नी दिपाली, तिचा बॉयफ्रेंड उमेश आणि तिची मैत्रीण सुप्रिया यांना अटक केली आहे. या घटनेने रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.