अमित शाह यांच्याशी काय चर्चा झाली? पालकमंत्रीपदाबाबत काही ठरले का? सुनील तटकरे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 19:18 IST2025-04-12T19:16:04+5:302025-04-12T19:18:27+5:30

NCP AP Leader Sunil Tatkare On Amit Shah Visit: भरत गोगावले, उदय सामंत या सर्वांनाच निमंत्रित केले होते. पण गोगावले आले नाहीत. ते का आले नाहीत हे मला माहिती नाही. मी माझे कर्तव्य केले, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

ncp ajit pawar group leader sunil tatkare told about what exactly discussion done in amit shah visit raigad | अमित शाह यांच्याशी काय चर्चा झाली? पालकमंत्रीपदाबाबत काही ठरले का? सुनील तटकरे म्हणाले...

अमित शाह यांच्याशी काय चर्चा झाली? पालकमंत्रीपदाबाबत काही ठरले का? सुनील तटकरे म्हणाले...

NCP AP Leader Sunil Tatkare On Amit Shah Visit: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. अमित शाह यांच्या या दौऱ्यावेळी रायगडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उदयनराजे, शिवेंद्रराजे यांच्यासह महायुतीतील अनेक नेते उपस्थित होते. यानंतर अमित शाह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी पोहोचले. यावेळी अमित शाह यांच्यासोबत काय चर्चा झाली? पालकमंत्रीपदाबाबत नेमके काय ठरले? अशा प्रश्नांवर सुनील तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत उत्तरे दिली.

अमित शाह यांचा रायगड दौरा आणि सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम राजकीय वर्तुळात अगदी चर्चेचा विषय ठरला. एकीकडे रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत धुसपूस सुरू असताना दुसरीकडे अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील नियोजित कार्यक्रमावरूनही राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आपल्यालाच हवे, यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांचा आग्रह कायम आहे. तर दुसरीकडे सुनील तटकरे पालकमंत्रीपदावरील दावा सोडण्यास तयार नाहीत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमकही झाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर सडकून टीकाही केली जात आहे. यात अमित शाह थेट सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले म्हटल्यावर शिवसेना शिंदे गटात चांगलीच चलबिचल झाल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात आता सुनील तटकरे यांनी माहिती दिली. 

अमित शाह यांच्याशी काय चर्चा झाली? पालकमंत्रीपदाबाबत काही ठरले का?

माझे कर्तव्य होते, मी भरत गोगावले, उदय सामंत या सर्वांनाच निमंत्रित केले होते. पण गोगावले आले नाहीत. ते का आले नाहीत हे मला माहिती नाही.  पण मी माझे कर्तव्य केले. राजकारणाच्या पलीकडे आणि एका विशिष्ट बाबींच्या पलीकडे सार्वजनिक जीवनामध्ये परस्परांचे संबंध राहिले पाहिजे. बाकी त्याबद्दल आणखी काही बोलणार नाही. अमित शाह यांच्या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वांचा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात संवाद होता. अमित शाह यांची ही भेट कौटुंबिक होती. या भेटीत अमित शाह यांच्याबरोबर मनमोकळेपणाने चर्चा झाली. तसेच अमित शाह यांच्या जेवणात महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश होता. आमच्या विनंतीला मान देऊन अमित शाह हे घरी आले,  शाह यांच्या उपस्थितीमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. शाह यांच्या उपस्थितीमध्ये कौटुंबिक चर्चा झाली, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी कशा प्रकारे समावेश होईल? यासाठी आमची चर्चा झाली. या भेटीत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. देशाच्या गृहमंत्र्यांना देशात कुठे काय चालले? हे माहिती असते. अनेक व्यक्तिमत्वाबाबतची माहिती त्यांच्याकडे असते. शेवटी ते मोठे नेते आहेत. राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर ते त्या स्थानावर पोहोचलेत, याचा अभिमान आहे. अनेकदा त्यांच्याशी संवाद साधताना देशातील राजकारणासह राज्यातील राजकारणाच्या खाचाखोचा माहिती होतात, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: ncp ajit pawar group leader sunil tatkare told about what exactly discussion done in amit shah visit raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.