"तटकरेंच्या घरीच रचला हत्येचा कट"; मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर महेंद्र थोरवेंचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 15:30 IST2025-12-27T14:56:43+5:302025-12-27T15:30:09+5:30
खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडीतील घरात हत्येचा कट रचण्यात आल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला

"तटकरेंच्या घरीच रचला हत्येचा कट"; मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर महेंद्र थोरवेंचा गंभीर आरोप
Khopoli Mangesh Kalokhe Murder Case: खोपोली नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागून अवघे पाच दिवस उलटत नाही तोच मोठी घटना घडली. नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक मंगेश काळोखे यांची २६ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर घारे हे खासदार सुनील तटकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात, त्यामुळे या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण लागले आहे.
सुधाकर परशुराम घारे (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी), भरत भगत (जिल्हा प्रवक्ते, राष्ट्रवादी), रवींद्र परशुराम देवकर, दर्शन रवींद्र देवकर, धनेश रवींद्र देवकर, सचिन संदीप चव्हाण, रवींद्र देवकर यांचा बाऊन्सर आणि इतर ३ जण अशी आरोपींची नावे आहेत.
निवडणुकीतील पराभवाचा बदला?
खोपोली नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ३ मध्ये मानसी काळोखे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उर्मिला देवकर उभ्या होत्या. २१ डिसेंबरला लागलेल्या निकालात उर्मिला देवकर यांचा ७०० पेक्षा जास्त मतांनी दारूण पराभव झाला. या पराभवाचा राग आणि राजकीय वैमनस्यातून हा कट रचल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मयत मंगेश काळोखे हे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचे खंदे समर्थक होते, तर सुधाकर घारे यांनी विधानसभा निवडणुकीत थोरवे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती.
सुनील तटकरेंच्या घरात हत्येचा कट? थोरवेंचा खळबळजनक आरोप
या हत्येनंतर शिवसेना (शिंदे गट) आमदार महेंद्र थोरवे यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. मंगेश काळोखे यांच्या हत्येचा कट खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडीतील निवासस्थानी रचण्यात आला, असा दावा थोरवे यांनी केला आहे. या आरोपामुळे महायुतीतील दोन मित्रपक्षांमधील संघर्ष चव्हाट्यावर आला असून रायगडच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.
"लोकशाही पद्धतीने आतापर्यत सगळ्या निवडणुकांना आपण सामोरे गेलो. पण सुनील तटकरे रायगडमध्ये सत्तेत आल्यापासून रायगडमध्ये रक्तरंजित राजकारण सुरु आहे. बीडनंतर आता रायगडचे आका सुनील तटकरे आहेत. सुनील तटकरेंच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांना मारण्यात येत आहे. आजही सुधाकर घारे त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बैठका घेत आहेत. सुधाकर घारेचा याच्यामध्ये हात नाही असं सुनील तटकरे सांगत आहेत. या प्रकरणाचा त्यांनी तपास केला आहे का? याचा अर्थ हे सगळं पूर्वनियोजित आहे. सुधाकर घारे एफआयआरमधला आरोपी आहे. ही घटना घडण्याच्या दोन दिवस आधी रवी देवकर सरकारी वकिलांच्या मार्फत सुतारवाडीला गेला होता. तिथे सुनील तटकरेंसोबत बसून, चर्चा करुन नियोजितपणे मंगेश काळोखेंची हत्या करण्यात आली," असं महेंद्र थोरवे म्हणाले.
पोलिसांकडून तपास सुरू
निकालानंतर पाच दिवसांतच दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे खोपोलीत तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. आरोपींपैकी काही जण फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.