'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 16:28 IST2025-11-10T16:19:23+5:302025-11-10T16:28:22+5:30
Shinde Shiv Sena Ajit Pawar NCP: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील संघर्ष शिगेला पोहोचला आहे.

'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
Maharashtra Local body Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला युतीचा प्रस्ताव दिला. पण, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी तो फेटाळून लावला. इतकंच नाही, तर राष्ट्रवादीने कर्जतमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आघाडीही केली. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये वादाचा भडका उडाला. मतभेद बाजूला ठेवून सुनील तटकरेंना दिल्लीला पाठवलं, पण त्यांनी आम्हाला फसवलं म्हणत शिंदेंचे आमदार महेंद्र दळवींनी टीका केली. त्यावर आता महेंद्र दळवी हे डोक्यावर पडलेले आमदार आहेत म्हणत अनिकेत तटकरेंनी पलटवार केलाय. त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर येऊ लागला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती व्हावी, अशी भूमिका शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्याची आहे. त्यामुळे त्यांच्याकडून राष्ट्रवादीला प्रस्ताव दिला गेला. पण, तटकरेंकडून शिवसेनेचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. जिल्ह्यात आमची ताकद जास्त आहे. त्यामुळे जागा कशा मिळवायच्या हे आम्हाला माहिती आहे, असे तटकरे शिवसेनेच्या प्रस्तावावर म्हणालेले.
शिंदेंचे नेते तटकरेंवर भडकले
राष्ट्रवादीने प्रस्ताव फेटाळल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेतून टीकेचा आणि इशाऱ्यांचा सूर उमटला. शिवसेनेचे मंत्री भगत गोगावले म्हणाले की, 'जिल्ह्यात महायुतीचा ताळमेळ अद्याप जमलेला नाही. असे असले तरी शिवसेना अजूनही युतीबाबत आशावादी आहे. महायुती झाली तर त्याचे स्वागत करूच पण स्वबळाची भाषा कोणी करत असेल, तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईन', असा इशारा गोगावलेंनी दिला.
आमदार महेंद्र दळवींनी तर सुनील तटकरेंनी फसवल्याचा आरोप केला. ते म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीत आम्ही मतभेद बाजूला ठेवले आणि सुनील तटकरेंना दिल्लीला पाठवले. पण, त्यांनी आम्हाला फसवले.'
'आमदार दळवी डोक्यावर पडलेले आहेत'
दळवींनी थेट तटकरेंवर दगा दिल्याचा आरोप केला गेला. त्याला अनिकेत तटकरेंनी उत्तर दिले. 'आमदार महेंद्र दळवी हे डोक्यावर पडलेले आमदार आहेत. ते स्वतःला चिटर आमदार असं म्हणतात. त्यामुळे ते दुसऱ्यालाही त्याच नजरेने पाहतात', असा पलटवार तटकरेंनी केला. त्यामुळे वादाचा भडका उडाला.
आमदार दळवीही अनिकेत तटकरेंना उत्तर देताना म्हणाले, 'घोडा मैदान आता जास्त लांब नाही. त्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. मुख्यालयात आमदार असणाऱ्यांना त्यांच्याच होम ग्राऊंडवर उमेदवार सापडत नाहीत. त्यांनी आम्हाला आव्हान देऊ नये', असे प्रत्युत्तर दळवींनी तटकरेंना दिले. त्यामुळे रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतच संघर्ष वाढला आहे.