महाड, रोह्यामध्ये महायुतीचे कार्यकर्ते भिडले, रायगड जिल्ह्यात मतदानादरम्यान तुंबळ हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 09:18 IST2025-12-03T09:16:00+5:302025-12-03T09:18:07+5:30

महाडमध्ये अजित पवार गट आणि शिंदेसेना तर रोहामध्ये अजित पवार गट आणि भाजपमध्ये राडा झाला. त्यामुळे दोन्ही ठिकाणी तणावाचे वातावरण होते.

Mahayuti activists clashed in Mahad and Rohya, violent clashes during voting in Raigad district | महाड, रोह्यामध्ये महायुतीचे कार्यकर्ते भिडले, रायगड जिल्ह्यात मतदानादरम्यान तुंबळ हाणामारी

महाड, रोह्यामध्ये महायुतीचे कार्यकर्ते भिडले, रायगड जिल्ह्यात मतदानादरम्यान तुंबळ हाणामारी

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १० नगरपालिकांसाठी मंगळवारी झालेल्या मतदान प्रक्रियेला महाड आणि रोह्यामध्ये  गालबोट लागले. महाडमध्ये अजित पवार गट आणि शिंदेसेना तर रोहामध्ये अजित पवार गट आणि भाजपमध्ये राडा झाला. त्यामुळे दोन्ही ठिकाणी तणावाचे वातावरण होते. दरम्यान, कर्जतमध्ये ईव्हीएम मशीन बिघाडामुळे मतदानात व्यत्यय आल्याने अनेक जण मतदान न करता निघून गेले, तर माथेरानमध्ये पाच लाखांची रोकड जप्त करण्यात आली. महाड, रोहा येथे झालेल्या राड्याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. 

रोहा नगरपालिका निवडणुकीत दुपारी प्रभाग ९ ‘ब’मधील अजित पवार गटाचे उमेदवार समीर सपकाळ यांनी बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला. यावरून अजित पवार गट आणि भाजप कार्यकर्ते भिडले. रोहा पोलिसांनी  हस्तक्षेप करून सर्व प्रकार थांबविले आणि मतदान केंद्र सुरळीत सुरू ठेवण्यात आले. 

सायंकाळपर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती रोहा पोलिस निरीक्षक मारुती पाटील यांनी दिली.

महाडमधील प्रभाग दोन आणि तीन या ठिकाणी मतदान सुरू होते; मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास शिंदेसेनेच्या विकास गोगावले यांचे कार्यकर्ते आणि अजित पवार गटाचे सुशांत जाबरे यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. 

त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. जाबरे यांच्या दोन गाड्या यावेळी फोडण्यात आल्या आहेत. जाबरे यांनी माझ्यावर पिस्तूल रोखले असून, ते पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याचे विकास गोगावले यांनी म्हटले आहे, तर काही कार्यकर्त्यांनाही जबर मारहाण झाली असून, ते गंभीर जखमी झाले आहेत.
 
कर्जत नगरपरिषदेसाठी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. मात्र, अनेक प्रभागांत मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिन बंद पडू लागल्या होत्या. त्यामुळे अनेक मतदार हे मतदान न करता माघारी फिरले. तर अनेक मतदान केंद्रावर मतदारांसाठी सोयीसुविधा केल्या नसल्याने मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

शांतता भंग करण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत : उपमुख्यमंत्री अजित पवार
 
अलिबाग : महाडमध्ये अजित पवार गट आणि शिंदेसेना यांच्यात झालेल्या राड्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीत शांतता भंग करण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी नाव न घेता मंत्री भरत गोगावले यांना दिला. 

आघाडी हा धर्म राजकीय वर्तुळातील सर्वांनी पाळला पाहिजे, परंतु त्याही पुढे जाऊन जो कोणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करेल किंवा जोर-जबरदस्तीने मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करेल, तो संविधानाच्या विरोधात आणि महाराष्ट्राच्या मूल्यांच्या विरोधात वागत आहे, अशा प्रकारचे वर्तन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे अजित पवार यांनी पुढे म्हटले आहे.

माथेरानमध्ये पकडली पाच लाखांची रोकड

माथेरान पोलिस ठाणे हद्दीत माथेरान नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना सकाळी सव्वा दहाच्या सुमारास प्रकाश राजेंद्र गुप्ता (वय ४०, रा. हॉटेल बाईक माथेरान, मूळ रा. इस्लामपूर, ता. जि. झुंझुनू, राजस्थान) हा लेकव्ह्यू हॉटेल माथेरान जवळ पिशवीमध्ये रक्कम घेऊन जात आहे, अशी माहिती मिळाली होती.

या ठिकाणी पोलिस कर्मचारी व स्थिर सर्वेक्षण पथक पाठवून पिशवी तपासली असता पाच लाख रोकड सापडली. ही रोकड पगार देण्याकरिता घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले.

बदलापुरात शिंदेसेना अन् भाजप कार्यकर्त्यांत राडा

बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या मतदान दरम्यान मंगळवारी अनेक ठिकाणी वादासह किरकोळ हाणामारीच्या घटना घडल्या. त्यामुळे काही भागांत तणावपूर्ण वातावरणात मतदानाची प्रक्रिया पार पडली. शिंदेसेना आणि भाजप या राज्यातील सत्ताधारी महायुती मधील पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे चित्र दिसले.  दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न करत होते. त्यामुळे निवडणुकीला काही अंशी गालबोट लागले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. 

काय काय घडले बदलापुरात?

पूर्वेकडे प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजप उमेदवार रमेश सोळसे यांनी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप केला. त्यानंतर शिंदेसेना-भाजप दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. यावेळी पोलिसांना जमावावर लाठीचार्ज करावा लागला.  

आपल्या नावावर दुसऱ्याच महिलेने मतदान केल्याचा दावा एका महिलेने केला. अनन्या परब असे या महिलेचे नाव आहे. तिच्या म्हणण्यानुसार तिचे आणि तिच्या पतीचे मतदार यादीत नाव होते. मात्र, मतदानावेळी आपल्या ऐवजी दुसरीच महिला मतदान करून गेली.
  
सकाळच्या सुमारास शिरगाव आपटेवाडी परिसरातील हेवन स्कूलमध्ये जवळपास पाऊण तास ईव्हीएम बंद असल्यामुळे मतदार ताटकळले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था केल्यानंतर मतदान पुन्हा सुरू झाले. तर  बदलापूर पश्चिमेकडील खामकर विद्यालयातील ईव्हीएम जवळपास तासभर बंद असल्यामुळे मतदारांचा गोंधळ उडाला.

Web Title : रायगढ़ नगर पालिका चुनावों में सहयोगियों के बीच झड़प; हिंसा की खबरें

Web Summary : रायगढ़ नगर पालिका चुनाव में महाड, रोहा और बदलापुर में सत्तारूढ़ सहयोगियों के बीच झड़पें हुईं। ईवीएम की गड़बड़ियों और नकदी जब्ती ने अराजकता को और बढ़ा दिया। अजित पवार ने शांति भंग करने वालों को चेतावनी दी।

Web Title : Clash Erupts Between Allies During Raigad Municipal Elections; Violence Reported

Web Summary : Raigad municipal elections marred by clashes between ruling allies in Mahad, Roha, and Badlapur. EVM glitches and cash seizures added to the chaos. Ajit Pawar warned against disturbing peace.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.