सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 18:38 IST2025-09-30T18:37:55+5:302025-09-30T18:38:52+5:30
पनवेल, उरण येथील शिवसेना शिंदेगटाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला

सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायगड जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस एक प्रमुख पक्ष म्हणून काम करत असून जसा सचिन तेंडुलकर मॅचविनर खेळी करायचा तशीच मॅचविनर खेळी करुन भविष्यात आपल्या जिल्ह्यात पक्षाला बळ देऊ, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी मुंबईत केले. पनवेल, उरण येथील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्यामुळे विचारधारेवर ठाम रहात आम्ही एनडीएमध्ये सहभागी होण्याचा घेतलेल्या निर्णयाला राज्यातील जनतेने मोठया प्रमाणात पाठिंबा देत विधानसभेत घवघवीत यश मिळवून दिले. भविष्यातही NDAचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस उत्तम काम करेल, असा विश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
पनवेल, उरण येथील शिवसेना शिंदेगटाचे युवासेना राज्य सचिव आणि कोकण समन्वयक रुपेश पाटील, समाजसेवक तेजस ढकी, युवासेना जिल्हा अध्यक्ष रोशन पवार, युवासेना विधानसभा अध्यक्ष रोशन कृष्ण पुजारी, खारघर उपशहर प्रमुख शैलेश शिंदे, खारघर महिला शहर प्रमुख चंचला संदेश बनकर, मुस्लिम युवा नेते हाजी मुद्दस्सर पटेल आदींनी प्रवेश केला.