खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 09:54 IST2025-12-26T09:51:54+5:302025-12-26T09:54:51+5:30
खोपोलीमध्ये शिंदेसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.

खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
खोपोलीमध्ये शिंदेसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली आहे. काळोखे यांच्यावर आरोपींनी अचानक हल्ला केला. त्यात जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. काही प्रत्यक्षदर्शींनी हल्लेखोरांना बघितले असून, त्यांच्या माहितीवरून खोपोली पोलीस शोध घेत आहेत.
मंगेश काळोखे हे माजी नगरसेवक होते. सध्या त्यांच्या पत्नी नगरसेविका आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मंगेश काळोखे हे मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेले होते. मुलाला शाळेत सोडल्यानंतर परत येत असतानाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
परत येत असतानाच अडवले
शुक्रवारी सकाळी मुलाला शाळेत सोडल्यानंतर ते घरी परत येत होते. रस्त्यामध्येच काही जणांनी त्यांना अडवले आणि त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोर एका काळ्या वाहनातून आले होते. त्यांनी चेहरे झाकलेले होते.
हल्ल्यात मंगेश काळोखे हे गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर ते फरार झाले. तर गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या काळोखे यांचा मृत्यू झाला. सध्या पोलीस प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीवरून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
नगरपालिका निवडणुकीनंतरची घटना
काही दिवसांपूर्वी खोपोली नगरपालिकेची निवडणूक झाली. त्यात मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे या शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडून आल्या. निकाल लागून काही दिवस लोटत नाही, तोच मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची हत्या कुणी आणि का केली? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.