अंशुल स्पेशालिटी मॉलिक्यूल लि. कंपनीत वायुगळती; तिघांना त्रास, एक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 03:22 PM2021-05-20T15:22:26+5:302021-05-20T15:27:26+5:30

आमदार अनिकेत तटकरे यांनी कंपनी प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता, त्यांनी आम्ही ही बाब सांगणारच होतो, असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

Gas leakage in the Anshul Specialty Molecule Ltd. company; Trouble to three | अंशुल स्पेशालिटी मॉलिक्यूल लि. कंपनीत वायुगळती; तिघांना त्रास, एक गंभीर

अंशुल स्पेशालिटी मॉलिक्यूल लि. कंपनीत वायुगळती; तिघांना त्रास, एक गंभीर

Next

धाटाव - एमआयडीसीमध्ये वायुगळती होऊन तीन कामगारांना त्रास झाला. त्यांना डॉ. जाधव हॉस्पिटल रोहा येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार अनिकेत तटकरे यांनी तत्काळ कंपनी प्रशासनाकडे संपर्क साधला. कंपनी प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. म्हणून त्यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली. तेथील कंपनी प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता, झालेल्या दुर्घटनेबाबत कंपनी प्रशासन गंभीर दिसले नाही.
 
यानंतर आमदार अनिकेत तटकरे यांनी रोहा येथील डॉक्टर जाधव यांच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कामगारांची चौकशी केली. तेथे दोनच कामगार उपचार घेताना दिसले. तर तिसऱ्या कामगाराबद्दल विचारणा केली असता सदर कामगार अत्यवस्थ असल्याने त्याला पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असल्याचे समजले. महत्वाचे म्हणजे कंपनी प्रशासन ही बाब लपवत असल्याचे दिसून आले.

आमदार अनिकेत तटकरे यांनी कंपनी प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता, त्यांनी आम्ही ही बाब सांगणारच होतो, असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. खरे तर, अशी दुर्घटना होऊ नये म्हणून कंपनी प्रशासनाने या बाबतीत योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असताना कंपनी प्रशासन या बाबतीत गंभीर नसेल आणि तेथे काम करणाऱ्या कामगारांच्या जीवाशी, अशा प्रकारचा खेळ होणार असेल, तर लोकप्रतिनिधी म्हणून आपण कदापि सहन करणार नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया आमदार अनिकेत तटकरे यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कंपनीमध्ये अशाच प्रकारची दुर्घटना होऊन ११ कामगारांना त्रास झाला होता, यावेळीसुद्धा आमदार अनिकेत तटकरे यांनी हॉस्पिटलला भेट दिली होती. तेंव्हाही कंपनी प्रशासनाने आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ, यापुढे, अशी घटना होणार नाही, असे स्पष्ट केले होते. परंतु एक वर्षाचा कालावधी उलटत नाही, तोच पुन्हा तशीच दुर्घटना होते आणि कंपनी प्रशासन त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करते, हा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. कारण एखादी मोठी दुर्घटना घडली तर कामगारांबरोबरच परिसरातील नागरिकांनाही त्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे कंपनी प्रशासनाच्या या निष्काळजीपणाकडे दुर्लक्ष करणे, म्हणजे अनेक कामगार व नागरिकांचा जीव टांगणीला ठेवणे आहे. या दुर्घटनेची चौकशी केली जाईल. जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या कंपनी प्रशासनावर  कठोर कारवाई करण्यासंदर्भात आपण पाठपुरावा करणार असल्याचे आमदार अनिकेत तटकरे यांनी म्हटले आहे.

Web Title: Gas leakage in the Anshul Specialty Molecule Ltd. company; Trouble to three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.