चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 06:05 IST2025-04-18T06:04:56+5:302025-04-18T06:05:56+5:30
Karjat Crime: खालापूर तालुक्यातील एका शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसमध्ये हा प्रकार घडला.

चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल
कर्जत : एका शाळेच्या बसमधील क्लिनर तरुणाने चार विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
खालापूर तालुक्यातील एका शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसमध्ये हा प्रकार घडला. आरोपी हा विद्यार्थ्यांना बसमधून उतरविणे आणि शाळेत पोहोचविण्याचे काम करत होता.
गेल्या वर्षभरात त्याने अनेक वेळा मुलींचा लैंगिक छळ केला आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या एका पाच वर्षांच्या मुलीने या प्रकाराबाबत आईला माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आरोपीविरोधात कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
तळा : शहरात एका ३३ वर्षीय तरुणाने १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आरोपीने बांधकाम सुरू असलेल्या घरात लैंगिक अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच तळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली, तर पीडित मुलीला उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.