शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 23:13 IST2025-04-19T23:06:17+5:302025-04-19T23:13:08+5:30
शेकापच्या संतोष पाटलांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून एकाच वेळी दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे.

शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
श्रीवर्धन तालुक्यातील मौजे वेळास आदगाव येथील वेळास आगर समुद्रकिनारी रविवारी मोठी दुर्घटना घडली. सुमद्रकिनारी रविवारी सकाळी क्रिकेट खेळत असताना बॉल समुद्रात गेल्याने तो पकडण्यासाठी पाण्यात गेलेल्या तीन तरुणांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत शेतकरी कामगार पक्षाचे म्हसळा तालुक्याचे चिटणीस संतोष पाटील यांच्या दोन्ही तरुण मुलांचा मृत्यू झाला. यावेळी नवी मुंबईतून आलेल्या एका पाहुण्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे समर्थक व म्हसळा तालुक्याचे सरचिटणीस संतोष पाटील यांच्या दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. संतोष पाटील यांचे दोन्ही मुले त्यांच्या बहिणीच्या मुलाला घेऊन श्रीवर्धन तालुक्यातील वेळास समुद्रकिनारी गेले होते. मात्र या दुर्दैवी घटनेत अवधूत संतोष पाटील (वय २६) व मयुरेश संतोष पाटील (वय २३), तसेच हिमांशू संतोष पाटील या तिघांचा मृत्यू झाला. खेळताना बॉल पाण्यात गेल्यानंतर तो आणण्यासाठी गेल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच वेळास गावातील तरुण, दिवेआगरचे सरपंच व उपसरपंच यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ चार ते पाच जेटस्की बोटी घटनास्थळी पाठवल्या. काही वेळातच आदगाव येथील स्थानिक तरुण आणि दिघी सागरी पोलिसांनी तिघांना बाहेर काढले. त्यानंतर बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र, नाका तोंडात पाणी गेल्याने त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि अखेर तिघांचाही मृत्यू झाला.या घटनेमुळे संपूर्ण श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यात शोककळा पसरली आहे.