अलिबाग हादरलं! 'कुकूच-कु' कंपनीच्या मालकाच्या घरावर सशस्त्र दरोडा; १५ लाखांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 14:23 IST2026-01-04T14:23:01+5:302026-01-04T14:23:50+5:30
प्रसिद्ध 'कुकूच-कु' कंपनीचे मालक कुनाल पाथरे यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून सुमारे १५ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे.

अलिबाग हादरलं! 'कुकूच-कु' कंपनीच्या मालकाच्या घरावर सशस्त्र दरोडा; १५ लाखांचा ऐवज लंपास
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मापगाव परिसरात दरोडेखोरांनी मोठा हात मारला आहे. प्रसिद्ध 'कुकूच-कु' कंपनीचे मालक कुनाल पाथरे यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून सुमारे १५ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि औद्योगिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
कुटुंबीयांना धमकावून लुटमार
कुनाल पाथरे यांचे कुटुंब शुक्रवारी रात्री गाढ झोपेत असताना सुमारे दीड वाजेच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटे आणि ड्रॉवर उचकटत असताना आवाजाने घरातील सदस्यांना जाग आली. मात्र, चोरट्यांनी शस्त्रांचा धाक दाखवून सर्वांना धमकावले. यानंतर दरोडेखोरांनी घरातील १ लाख ५० हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि कुटुंबाचे मोबाईल फोन असा एकूण १५ लाखांचा ऐवज लंपास केला आणि अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
सीसीटीव्ही नसल्याचा चोरट्यांना फायदा
पाथरे यांच्या घराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची बाब समोर आली आहे. नेमकी याच गोष्टीचा फायदा दरोडेखोरांनी घेतला. सीसीटीव्ही फुटेज नसल्याने आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. मात्र, पोलिसांनी परिसरातील इतर मार्गांवरील सीसीटीव्ही आणि मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे तपास चक्रावून सोडला आहे.
पोलीस यंत्रणा 'ॲक्शन मोड'वर
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी तपासाबाबत स्थानिक पोलिसांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. या मोहिमेत अलिबागच्या उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे, पोलीस निरीक्षक किशोर साळे, सोमनाथ लांडे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे आणि इतर पथक तैनात करण्यात आले आहे.
गुन्हेगारांच्या मुसक्या लवकरच आवळणार सध्या पोलिसांनी अलिबाग आणि मांडवा परिसरात नाकाबंदी केली असून संशयितांची चौकशी सुरू आहे. "आम्ही विविध बाजूंनी तपास करत असून विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने लवकरच आरोपींपर्यंत पोहोचू," असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.