नागोठणे : पहिल्या टप्प्यात ३५१ प्रकल्पग्रस्तांना रिलायन्समध्ये ठेकेदारीत नोकरी मिळण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, उर्वरित प्रकल्पग्रस्तांना नोकरीत घेण्याचा शब्द मिळाला असून, आज सोमवारी ५३ व्या दिवशी आंदोलनाला स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केली.
रिलायन्सच्या वतीने पहिल्या टप्प्यात ३५१ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याने लोकशासनाच्या वतीने २७ नोव्हेंबरपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर चालू करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाला संघटनेच्या वतीने ५३ व्या दिवशी स्थगिती देण्यात आली. त्यावेळी घेण्यात आलेल्या जाहीर सभेत कोळसे पाटील बोलत होते. या सभेला संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार राजेंद्र गायकवाड, जिल्हाध्यक्ष शशांक हिरे, स्थानिक सरचिटणीस गंगाराम मिणमिणे, अध्यक्ष चेतन जाधव, सुरेश कोकाटे, प्रबोधिनी कुथे, मोहन पाटील, उषा दाभाडे, एकनाथ पाटील, सुजित शेलार आदींसह पदाधिकारी आणि हजारो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. आपल्याला पूर्ण यश मिळाले नसले तरी लढाई अजून संपलेली नाही. खा. सुनील तटकरे यांनी शेवटच्या प्रकल्पग्रस्ताला रिलायन्समध्ये नोकरी मिळाल्याशिवाय थांबणार नसल्याचे सांगितले असल्याचे कोळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
ज्यांच्या पदरात पडत आहे, त्यांनी उर्वरित लोकांना कंपनीत नोकरी मिळण्यासाठी सहकार्य करावे, असा सल्ला यावेळी दिला. ही माघार नाही, तर आपण आज यशस्वी झालो आहोत, असे मी मानतो असे कोळसे पाटील म्हणाले.
‘आंदोलनाने अहिंसेच्या मार्गाने लढायला शिकविले’
- गेल्या दोन वर्षांपासून आपण लढत आहोत. आजचे आंदोलन आपण मागे घेतले नसून, त्याला स्थगिती दिली आहे. आतमध्ये नोकरीसाठी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांनी बाहेरच्या २७५ जणांना कधीही विसरून चालणार नाही.
- यांच्या न्याय्य हक्कासाठी आपल्याला पुढे लढतच राहायचे आहे. ५३ दिवसांच्या या आंदोलनाने अहिंसेच्या मार्गाने कसे लढायचे हे नक्कीच शिकवले गेले असल्याचे राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले.
‘मागण्या पूर्ण होतील’ आपल्या मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील, असा शब्द रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
Web Title: agitation against Reliance finally suspended on 53rd day
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.