नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 16:20 IST2025-12-26T16:19:21+5:302025-12-26T16:20:45+5:30
रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची हत्या करण्यात आली. हत्येच्या घटनेनंतर खोपोली बंदची हाक देण्यात आली. त्यानंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्याला घेराव घातला.

नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली. शुक्रवारी (२६ डिसेंबर) सकाळी ही घटना घडली. नगर परिषदेचा निकाल जाहीर झाल्यानंतर चार दिवसांमध्येच हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर संतप्त लोकांनी पोलीस ठाण्याला घेराव घालत पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.
सकाळी सात वाजेच्या सुमारास मंगेश काळोखे यांची काही हल्लेखोरांनी हत्या केली. त्यांचा मृतदेह रस्त्यावरच पडलेला होता. हत्या केल्यानंतर आरोपी काळ्या रंगाच्या कारमधून फरार झाले.
मंगेश काळोखे हे माजी नगरसेवक होते. सकाळी ते मुलाला शाळेत सोडायला गेले होते. शाळेतून परत येत असतानाच त्यांच्यावर हल्ला झाला. तोंडाला रुमाल बांधलेल्या लोकांनी त्यांच्यावर वार केले आणि हत्या केली.
जनक्षोभ उसळला, पोलीस ठाण्याला घेराव
मंगेश काळोखे यांच्या हत्येची बातमी काही मिनिटांतच शहरात पसरली. त्यानंतर लोक हळूहळू गर्दी करू लागले. त्यानंतर प्रचंड संख्येने लोक खोपोली पोलीस ठाण्याच्या समोर आले. पोलीस ठाण्याला घेराव घालत, जोपर्यंत आरोपींना पकडणार नाही, तोपर्यंत हटणार नाही. पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांना निलंबित करण्याची मागणीही करण्यात आली.
जीवाला धोका असल्याचे सांगितले होते
पोलीस अधीक्षक आंचल दलाल या सुद्धा खोपोलीमध्ये आल्या. त्यांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोक ठिय्या देत मागणीवर कायम होते. मंगेश काळोखे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे पोलिसांना सांगितले होते. पण, पोलिसांकडून दखल घेतली गेली नाही आणि आता त्यांची हत्या करण्यात आली, असे लोकांनी पोलीस अधीक्षकांना सांगितले.