महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 05:51 IST2025-12-04T05:49:58+5:302025-12-04T05:51:07+5:30
सुशांत जाबरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते त्यांच्या कारने निवडणुकीचा आढावा घेत असताना काही जणांनी कारजवळ जात शिवीगाळ दमदाटी आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
महाड : महाड नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी झालेल्या दोन गटांतील हाणामारी प्रकरणात महाड शहर पोलिस ठाण्यामध्ये परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यामध्ये पोलिसांनी २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अजित पवार गटाचे सुशांत जाबरे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये शिंदेसेनेच्या विकास गोगावले यांच्या नावाचा समावेश केला आहे.
सुशांत जाबरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते त्यांच्या कारने निवडणुकीचा आढावा घेत असताना काही जणांनी कारजवळ जात शिवीगाळ दमदाटी आणि जिवे मारण्याची धमकी दिली. त्याचबरोबर प्रचंड आक्रमक होत आजुबाजूच्या गाड्यांच्या काचा फोडल्या. माझ्यासह अंगरक्षक गोपाल सिंग यालाही मारहाण केली, असा आरोप सुशांत जाबरे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
याप्रकरणी विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सुरज मालुसरे, सिद्धेश शेठ (सर्व रा. ढाळकाठी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या तक्रारीत महेश निवृत्ती गोगावले (३९, रा. पिंपळवाडी, महाड) यांनी महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सुशांत जाबरे रा. टोळ, हनुमंत मोतीराम जगताप, श्रीयश माणिक जगताप, धनंजय (बंटी) देशमुख, जगदीश पवार (सर्व रा. महाड), नीलेश महाडिक (रा. किंजळोली, महाड) तसेच अमित शिगवण, व्यंकट मंडाला, गोपालसिंग, मंजितसिंग अरोरा, मोनीश पाल, समीर रेवाळे आणि इतर ८ ते १० जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, दोन गटांत झालेल्या हाणामारीत परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
तक्रार महाड शहर पोलिस ठाण्यात वर्ग
गोगावले यांच्या तक्रारीनुसार, वरील सर्व आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने जमाव जमवला. यापैकी गोपालसिंग यांनी बंदूक रोखून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, तसेच इतरांनी काठी व हॉकीस्टिकने कार्यकर्त्यांना मारहाण केली.
यादरम्यान विजय मालुसरे यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावून नेल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या दोन्ही तक्रारी एकाच घटनेच्या परस्परविरोधी तक्रारी असून, संपूर्ण घटना महाड शहरात घडल्यामुळे तक्रार महाड शहर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली असून तपास सुरू आहे.