ZP President Election: झेडपीला मिळणार अध्यक्ष-उपाध्यक्ष, आज होणार निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 10:10 IST2026-03-18T10:10:32+5:302026-03-18T10:10:46+5:30
अध्यक्षपदासाठी दौंडमधील वीरधवल जगदाळे यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

ZP President Election: झेडपीला मिळणार अध्यक्ष-उपाध्यक्ष, आज होणार निवड
पुणे : जवळपास चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पुणेजिल्हा परिषदेला अखेर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मिळणार आहेत. या पदांसाठी आज (दि. १८) निवडणूक होत असून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेत ही प्रक्रिया पार पडणार आहे.
अध्यक्षपदासाठी दौंडमधील वीरधवल जगदाळे यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर तुषार थोरात यांनीही पदासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ७३ पैकी ५१ गट जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजप १०, उद्धवसेना ६, शिंदेसेना ५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १ अशा जागांचे बलाबल आहे. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच जाणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.
अध्यक्षपद ‘सर्वसाधारण’ गटासाठी आरक्षित असल्याने अनुभवी सदस्याला संधी मिळणार की नव्या चेहऱ्याला नेतृत्वाची जबाबदारी दिली जाणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अध्यक्ष निवडीनंतर लगेचच प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे.
उपाध्यक्षपदासाठीही रस्सीखेच सुरू असून मुळशीचे शांताराम इंगवले, शिरूरच्या मोनिका हरगुडे, मावळ तालुक्यातील राऊत तसेच आंबेगावचे विष्णू हिंगे यांच्या नावांची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांच्याकडे पदाधिकारी निवडीचे अधिकार देण्यात आले असून त्यांनी जिल्ह्यातील आमदारांशी चर्चा केल्याची माहिती आहे.
आज सकाळी पक्षाच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांची बैठक घेऊन अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अंतिम नावे निश्चित केली जाणार आहेत.
आजची निवडणूक प्रक्रिया
सकाळी ११ ते दुपारी १: उमेदवारी अर्ज दाखल
दुपारी ३ वाजता: विशेष सभेला सुरुवात
अर्ज छाननी : सभेतच अर्जांची पडताळणी
माघार : १५ मिनिटांचा वेळ
अंतिम निवड : एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास हात उंचावून मतदान