डिलिवरी बॉयने जेवणाचे पार्सल देऊन जबरदस्तीने तरूणीचे दोनवेळा घेतले चुंबन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 14:37 IST2022-09-19T14:35:13+5:302022-09-19T14:37:49+5:30
कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल...

डिलिवरी बॉयने जेवणाचे पार्सल देऊन जबरदस्तीने तरूणीचे दोनवेळा घेतले चुंबन
किरण शिंदे/ प्रतिनिधी, पुणे: झोमॅटो ॲपवरून मागविलेले जेवणाचे पार्सल घेऊन आलेल्या एका व्यक्तीने 19 वर्षीय तरुणीचे जबरदस्तीने चुंबन घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येवलेवाडी परिसरातील एका नामांकित सोसायटीत शनिवारी रात्री हा प्रकार घडला. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
रईस शेख (वय 40, रा.कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. 19 वर्षीय तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणी येवलेवाडी परिसरातील एका नामांकित सोसायटीत राहते. शनिवारी रात्री तिने झोमॅटो ॲप करून जेवण मागवले होते. इथे घेऊन आरोपी रईस शेख रात्री साडेनऊच्या सुमारास तिच्या सोसायटीत आला होता.
जेवणाचे पार्सल दिल्यानंतर त्याने फिर्यादीला पिण्याचे पाणी मागितले. पाणी पिल्यानंतर थँक्यू म्हणण्याचा बहाणा करून त्याने फिर्यादी यांचा हात हातात घेतला. फिर्यादी यांनी हात सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने हात घट्ट पकडून फिर्यादीला जवळ ओढले आणि त्यांच्या गालाचे दोन वेळा चुंबन घेतले. या सर्व प्रकारानंतर फिर्यादी तरुणीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.