Zilla Parishad Election : शिंदेसेनेच्या नगराध्यक्षांनीच केला पक्षाच्याच उमेदवाराचा अर्ज बाद; नेमकं काय घडलं ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 15:10 IST2026-01-15T15:10:13+5:302026-01-15T15:10:35+5:30
-नाट्यमय घडामोडी, उलटसुलट चर्चा व अफवांमुळे ही निवडणूक प्रक्रिया दुपारी १२ पासून रात्री १० वाजेपर्यंत चालू होती.

Zilla Parishad Election : शिंदेसेनेच्या नगराध्यक्षांनीच केला पक्षाच्याच उमेदवाराचा अर्ज बाद; नेमकं काय घडलं ?
जुन्नर : शिवसेनेच्या नगराध्यक्षांनी शिवसेनेच्याच उमेदवाराचा उपनगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद केल्याने जुन्नर नगरपालिकेतील उपनगराध्यक्षपदाची निवडणूक चांगलीच गाजली. दिवसभर सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडी, उलटसुलट चर्चा व अफवांमुळे ही निवडणूक प्रक्रिया दुपारी १२ पासून रात्री १० वाजेपर्यंत चालू होती. अखेर अवघ्या २० नगरसेवकांच्या सभागृहात केवळ एक नगरसेवक असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका रूपाली आकाश परदेशी यांनी उपनगराध्यक्षपद पटकावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
उपनगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदेगटाच्या नगरसेवकांच्या शिवजन्मभूमी विकास मंचकडून अलकाताई फुलपगार, तर राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाच्या जुन्नर शहर विकास आघाडीकडून रूपाली परदेशी यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. नगरसेवकांच्या संख्याबळावर अलकाताई फुलपगार सहज निवडून येतील, अशी अपेक्षा होती. मात्र अवैध बांधकामाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अलकाताई फुलपगार यांच्या उमेदवारीवर हरकत घेण्यात आली.
या हरकतीवर निर्णय देत पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष सुजाता काजळे यांनी अलकाताई फुलपगार यांचा अर्ज बाद केल्याची माहिती बाहेर पसरताच सभागृहात मोठी खळबळ उडाली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान नगरसेवकांना मोबाइल फोन नेण्यास मनाई होती. तसेच नागरिक व माध्यमांना प्रवेश नसल्याने कोणतीही अधिकृत माहिती बाहेर येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला.
शिवसेनेच्या नगराध्यक्षांनी शिवसेनेच्याच उमेदवाराचा अर्ज बाद केल्याने शिंदेगटाच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. पीठासन अधिकाऱ्यांना उमेदवारी अर्ज बाद करण्याचा अधिकार आहे की नाही, यावरून शिंदेगट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये रात्री उशिरापर्यंत तीव्र खल सुरू होता. या पार्श्वभूमीवर तहसीलदार सुनील शेळके व प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी नगरपालिकेत येऊन निवडणूक प्रक्रियेची माहिती घेतली.
दरम्यान, बैठकीचे इतिवृत्त सभागृहात फाडण्यात आल्याची माहिती बाहेर पसरताच नगरपालिकेबाहेर घोषणाबाजी सुरू झाली. या प्रकरणी मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, इतिवृत्त कोणी फाडले, याबाबत चर्चा सुरू आहे. अधिकारी वर्ग सभागृहातून निघून गेल्याने नगरसेवक अधिकच संतप्त झाले. आम्हाला इतिवृत्ताची प्रत व सीसीटीव्ही फुटेज द्यावे, अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली. त्यानंतर नव्याने पुन्हा इतिवृत्त तयार करण्यात आले.
दरम्यान, नगरपालिकेबाहेर रूपाली परदेशी यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला होता. मात्र अधिकृत निकाल जाहीर होण्यास उशीर लागत असल्याने संभ्रम कायम होता. अखेरीस रात्री उशिरा शिंदेगटाचे नगरसेवक सभागृह सोडून गेले. पोलिस संरक्षणात नगराध्यक्ष सुजाता काजळे सभागृहाबाहेर पडल्या.
अखेर रात्री १० वाजता पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष सुजाता काजळे यांनी उपनगराध्यक्षपदी रूपाली आकाश परदेशी यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली. तसेच स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिफारस करण्यात आलेले भाऊसाहेब कुंभार यांची निवड जाहीर करण्यात आली. शिवसेना शिंदेगटाकडून शिफारस करण्यात आलेल्या जमीर कागदी यांच्या स्वीकृत नगरसेवकपदाचा निर्णय मात्र राखून ठेवण्यात आला. यानंतर शिवसेना तालुकाप्रमुख माउली खंडागळे, संदीप ताजने, मयूर रोकडे, महेश शेटे आदींसह कार्यकर्त्यांनी रूपाली परदेशी यांचे अभिनंदन केले.
व्हीप स्वीकारण्यास नकार
नगराध्यक्ष तथा पीठासन अधिकारी सुजाता काजळे यांनी पक्षाचा व्हीप स्वीकारण्यास नकार दिला. त्यांच्या घरावर व्हीप चिकटविण्यात आला होता. उपनगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया कायद्याला धरून न करता नियमबाह्य केल्याचा आरोप करीत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितल्याचे शिवसेना गटनेते विक्रम परदेशी यांनी सांगितले.
या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली असून, उपनगराध्यक्षपदाच्या निवडीबाबत त्यांच्याकडून येणाऱ्या निर्देशानुसार पुढील निर्णय घेतला जाईल. - गाेविंद शिंदे, प्रांताधिकारी