Zilla Parishad Election :जुन्नरमध्ये सत्तासमीकरण ठरले; राष्ट्रवादीची ताकद एकवटली; घड्याळावरच लढणार जि. प.–पं. स. निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 09:58 IST2026-01-20T09:53:48+5:302026-01-20T09:58:01+5:30
राष्ट्रवादी (अजित पवार), राष्ट्रवादी (शरद पवार) व शिवसेना (उबाठा) यांची आघाडी; खासदार अमोल कोल्हेंची घोषणा

Zilla Parishad Election :जुन्नरमध्ये सत्तासमीकरण ठरले; राष्ट्रवादीची ताकद एकवटली; घड्याळावरच लढणार जि. प.–पं. स. निवडणूक
नारायणगाव : जुन्नर तालुक्यात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उबाठा) हे तीनही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढविणार असून तालुक्यातील सर्व जागांवर दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे उमेदवार घड्याळाच्या चिन्हावरच निवडणूक लढवतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
नारायणगाव येथे या तीनही पक्षांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार अतुल बेनके, सभापती अॅड. संजय काळे, शिवसेना (उबाठा) चे तालुका समन्वयक दिलीप बाह्मणे, उपजिल्हा प्रमुख शरद चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे तालुकाध्यक्ष तुषार थोरात, ज्येष्ठ नेते अनंतराव चौगुले, माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, पीडीसी बँकेच्या संचालिका पूजा बुट्टे पाटील, बाजार समितीचे संचालक भास्कर गडगे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) महिला तालुकाध्यक्ष चंदा घाडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार कोल्हे म्हणाले की, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्याने पक्षाला अंतर्गत फायदा झाला. त्याच धर्तीवर मतविभागणी टाळण्यासाठी राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे झालेल्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला असून राज्यातील १२ जिल्हा परिषद निवडणुका एकत्रितपणे लढविल्या जाणार आहेत.
ते पुढे म्हणाले की, आंबेगाव तालुक्यात तुतारी व घड्याळ या चिन्हांवर एकमत होत नसल्याने तेथे वेगळा निर्णय घेतला जाईल. शिरूर व हवेली तालुक्यांतील आघाडीबाबत पुढील दोन दिवसांत अंतिम निर्णय होईल, तर खेड तालुक्यात शिवसेना (उबाठा) सोबत चर्चा सुरू आहे.
माजी आमदार अतुल बेनके यांनी सांगितले की, राष्ट्रवादी पक्षाने अधिकृत उमेदवार दिल्यानंतर त्यांच्या विरोधात बेशिस्त किंवा पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. तालुक्यातील सर्व जागांचे वाटप येत्या दोन दिवसांत जाहीर होईल. उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असून आघाडीचे सर्व आठही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माऊली खंडागळे नाराज
खासदार अमोल कोल्हे यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते सत्यशील शेरकर, शिवसेना (उबाठा) चे तालुका प्रमुख माउली खंडागळे व मंगेश काकडे उपस्थित नसल्याने तीन पक्षांच्या आघाडीच्या निर्णयाला त्यांची सहमती नाही, तसेच त्यांना विश्वासात न घेतल्यामुळे ते बैठकीला अनुपस्थित राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.