घरकाम करण्यास नकार दिल्याने फर्निचरचे काम करणाऱ्या तरुणाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 15:59 IST2019-06-19T15:57:20+5:302019-06-19T15:59:48+5:30
फर्निचरच्या कामासाठी ठेवलेल्या मुलाकडून घरकाम करुन घेण्यात येत हाेते. तरुणाने घरकाम करण्यास नकार दिल्याने त्याला जबर मारहाण करण्यात आली त्यात त्याचा मृत्यू झाला.

घरकाम करण्यास नकार दिल्याने फर्निचरचे काम करणाऱ्या तरुणाला मारहाण
पुणे : फर्निचरच्या कामावर असलेल्या मुलाकडून दुकानाचा मालक घरकाम करुन घेत असे. काही दिवसांनी तरुणाने घरकाम करण्यास नकार दिला. त्यावर दुकान मालकाने इतर आराेपींच्या मतदीने तरुणाला मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. याप्रकरणी तरुणाच्या वडीलांनी चंदननगर पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
रामस्वरुप ( वय 21 ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पप्पुराम, जगदीश, हजारीराम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाचे वडील हरजीदास यांनी तक्रार दाखल केली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरजीदास यांनी रामस्वरुप याला दाेन महिन्यापूर्वी आराेपीकडे फर्निचरच्या कामासाठी पुण्याला पाठवले हाेते. आराेपी हे मुलाकडून फर्निचरचे काम करुन घेण्याऐवजी कपडे धुणे, भांडी साफ करणे, स्वयंपाक तयार करणे अशी कामे देत. काही काळ ही कामे केल्यानंतर तरुणाने ही कामे करण्यास नकार दिल्याने आराेपींनी तरुणाला पाच मे राेजी चाैधरी वस्ती येथे डांबून ठेवले. तसेच त्याला जबरदस्त मारहाण केली. तरुणाला त्याच अवस्थेत आराेपींनी 6 मे ला राजस्थानला पाठवून दिले. त्याची प्रकृती खालावल्याने त्याची घरच्यांनी 11 मे राेजी त्याला राजस्थान मधील खसगी रुग्णालयात दाखल केले. 3 जून राेजी उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला.
याप्रकरणी तरुणाच्या वडीलांनी राजस्थान पाेलिसांकडे तक्रार दाखल केली. राजस्थान पाेलिसांनी सदर गुन्हा पुणे पाेलिसांकडे हस्तांतरीत केला.