प्रतिबंधित नायलॉन मांजाचा साठा, बिबवेवाडी पोलिसांकडून तरुणाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 13:09 IST2025-01-12T13:09:13+5:302025-01-12T13:09:21+5:30
बिबवेवाडी पोलिसांनी धडक कारवाई करत प्लास्टिक नायलॉन आणि सिंथेटिक मांजाचा साठा ठेवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करत अटक

प्रतिबंधित नायलॉन मांजाचा साठा, बिबवेवाडी पोलिसांकडून तरुणाला अटक
- किरण शिंदे
पुणे : पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर मनुष्य तसेच पक्षांसाठी जिवघेणा ठरतो. अशातच बिबवेवाडी पोलिसांनी धडक कारवाई करत प्लास्टिक नायलॉन आणि सिंथेटिक मांजाचा साठा ठेवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे ५० रिळ मांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चैत्रबन वसाहतीत छापा टाकला. यावेळी पृथ्वीराज राजेश म्हस्के (वय २३, रा. सिध्दार्थनगर, बिबवेवाडी) या इसमाकडून विविध रंगांच्या नायलॉन मांजाची ५० रिळ जप्त करण्यात आली. जप्त मालाची किंमत सुमारे १०,००० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पृथ्वीराज म्हस्के याच्याविरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम २२३ आणि १२५ तसेच पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ५ आणि १५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
मुख्य सचिव, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन यांनी २०१५ मध्ये नायलॉन मांजावर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. तसेच, पोलीस उपआयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर यांनी दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी पुणे शहरात मांजा विक्री आणि वापरावर बंदी घालण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार, प्रतिबंधित मांजाचा साठा ठेवणे, विक्री करणे आणि वापरणे हा कायद्याचा भंग ठरतो. या कारवाईमुळे शहरातील पक्षी आणि मनुष्यवर्गाला होणारे धोके कमी होण्यास मदत होईल, असे पोलिसांनी सांगितले.