पुण्यात मध्यरात्री भीषण प्रकार; नशेमुळे पडला अन् सात-आठ कुत्र्यांनी हल्ला केला; तरुण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 10:02 IST2026-01-08T10:00:34+5:302026-01-08T10:02:07+5:30
भटक्या कुत्र्यांनी तरुणाचे लचके तोडले, १० फूट नेले फरपटत

पुण्यात मध्यरात्री भीषण प्रकार; नशेमुळे पडला अन् सात-आठ कुत्र्यांनी हल्ला केला; तरुण गंभीर जखमी
पुणे : मद्यधुंद तरुण नशेमध्ये अडखळून पडल्यानंतर सात-आठ भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला चढविला. त्याचे कान, डोके फाडून टाकल्यावर त्याचे डोके तोंडात धरून त्याला १० फूट फरफटत नेले. त्यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. अक्षय प्रकाश चव्हाण (रा. धायरी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास नऱ्हे-वडगाव रस्त्यावर नऱ्हे पोलिस ठाण्यापासून जवळ असलेल्या एका अरुंद गल्लीमध्ये घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अक्षय चव्हाण हा त्याच्या मित्र सुनील बावधने याच्यासोबत रात्री दोनच्या सुमारास नऱ्हे-वडगाव रस्त्यावरील हिरो वाइन दुकानाशेजारील बोळात चढ चढून आले. वरच्या बाजूला काही खोल्यांसमोर त्यांनी गाडी लावली. मद्यप्राशनामुळे त्यांना चालता आले नाही अन् तोल जाऊन अक्षय चव्हाण खाली पडला. त्यावेळी तेथील सात-आठ कुत्र्यांचे टोळके त्याच्या अंगावर धावून गेले. नशेत असल्यामुळे अक्षय याला प्रतिकार करता आला नाही. कुत्र्यांनी त्याच्या कानाचे, डोक्याचे, चेहऱ्याचे लचके तोडले; त्यामुळे अक्षय रक्तबंबाळ झाला.
त्याच अवस्थेत कुत्र्यांनी त्याला १० फूट ओढत फरफटत नेले. सकाळी नऊ वाजेपर्यंत अक्षय रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडून होता. अनेकांना तो जखमी अवस्थेत पडलेला दिसला; मात्र कोणीच पोलिसांना वा रुग्णवाहिकेला संपर्क केला नाही. नऊ वाजता कचरावेचकांनी त्याला पाहिल्यावर पोलिसांना बातमी कळविली. पोलिसांनी अक्षयला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले.