"त्या मुलीने मला धोका दिला..." सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 15:34 IST2021-12-03T15:31:49+5:302021-12-03T15:34:43+5:30
पुणे : प्रेयसी आपली फसवणूक करत असल्याचा संशययातून आणि तिच्या मामाकडून सतत मिळणाऱ्या धमक्यांना कंटाळून एका 23 वर्षीय युवकाने राहत्या ...

"त्या मुलीने मला धोका दिला..." सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या
पुणे: प्रेयसी आपली फसवणूक करत असल्याचा संशययातून आणि तिच्या मामाकडून सतत मिळणाऱ्या धमक्यांना कंटाळून एका 23 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. पुण्याच्या कोथरूड परिसरातील किस्किंदानगरमध्ये हा प्रकार घडला. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने सुसाईड नोट लिहिली असून त्यामध्ये हा सर्व प्रकार लिहून ठेवला आहे. 15 नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला.
प्रशांत उर्फ मोन्या दीपक कदम (वय 23) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची प्रेयसी आणि तिचा मामा या दोघांविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत प्रशांत कदम याच्या आईने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कोरोनाच्या काळात प्रशांतची नोकरी गेली होती. तो एका मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात काम करीत होता. मागील काही वर्षापासून त्याचे पुण्यातीलच न-हे परिसरात राहणाऱ्या एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. परंतु या तरुणीच्या मामाला या दोघांचे संबंध मान्य नव्हते. त्यामुळे प्रशांत हा कायम तणावात राहायचा. प्रेयसी आपल्याला सोडून जाईल याची भीती त्याला वारंवार सतावत होती.
15 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या प्रेयसीचा मामा प्रशांतच्या घरी आला आणि त्याने प्रेयसीचा नाद सोडून दे असे म्हणत शिवीगाळ करत धमकी दिली होती. या सर्व प्रकारामुळे प्रशांत निराश आत गेला आणि त्याने त्याच दिवशी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली. त्यात "मी मोन्या कदम, मी आयुष्यात प्रेम केलं परंतु प्रेयसीने मला फसवले आणि तिच्या मामाने मला धमकी दिली. त्या मुलीने मला धोका दिला म्हणून मी केलं" अशा प्रकारचा मजकूर लिहिलेला आढळला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.