पुणे - महापालिकेत आज चांगलाच गोंधळ उडाला, जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी थेट आयुक्तांच्या दालनात घुसले आणि त्यानंतर मनसे नेते किशोर शिंदे व मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्यात जोरदार वाद झाला. यावेळी आयुक्तांनी थेट, "तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेले गुंड आहात," असे म्हणत मनसे कार्यकर्त्यांना धारेवर धरले. या वक्तव्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं.
अधिकच्या माहितीनुसार, आज पुणे महानगरपालिकेत आयुक्त नवल किशोर राम आपल्या दालनात एक बैठक घेत होते. त्याचवेळी मनसेचे नेते किशोर शिंदे काही कार्यकर्त्यांसह थेट त्यांच्या कक्षात प्रवेशले. या अनधिकृत प्रवेशामुळे आयुक्त भडकले आणि त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना तातडीने दालनाबाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर कार्यकर्ते संतप्त होऊन बाहेरच ठिय्या देऊन बसले. या दरम्यान दोन्ही बाजूंनी शाब्दिक चकमक सुरु झाली.