येळकोट येळकोट जय मल्हार; भंडाऱ्याची उधळण, जेजुरीत चैत्र पौर्णिमा यात्रेला हजारो भाविक खंडेराया चरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 15:08 IST2025-04-12T15:06:30+5:302025-04-12T15:08:02+5:30

रणहलगी, ढोल ताशांच्या गजरात विविध रंगाच्या आणि रंगीबेरंगी रेशमी कापडाने मढविलेल्या शिखरी काठ्या गडावर दाखल होताच बहुरंगी -बहुढंगी महाराष्ट्राचे दर्शन येथे घडत होते

Yelkot Yelkot Jai Malhar The Bhandara is being opened thousands of devotees visit khandoba for the Chaitra Pournima Yatra in Jejuri | येळकोट येळकोट जय मल्हार; भंडाऱ्याची उधळण, जेजुरीत चैत्र पौर्णिमा यात्रेला हजारो भाविक खंडेराया चरणी

येळकोट येळकोट जय मल्हार; भंडाऱ्याची उधळण, जेजुरीत चैत्र पौर्णिमा यात्रेला हजारो भाविक खंडेराया चरणी

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त आज हजारो भाविकांनी देवदर्शन घेत कुलधर्म -कुलाचार केला. भंडाऱ्याच्या उधळनीबरोबरच सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात संपूर्ण गडकोट निनादला. 

राज्याच्या विविध प्रांतातून बहुजन बांधवांच्या शिखरी काठ्या गडावर दाखल झाल्या होत्या. रणहलगी ,ढोल ताशांच्या गजरात विविध रंगाच्या आणि रंगीबेरंगी रेशमी कापडाने मढविलेल्या शिखरी काठ्या गडावर दाखल होताच बहुरंगी -बहुढंगी महाराष्ट्राचे दर्शन येथे घडत होते. तिव्र उन्हाळा, परीक्षांचा काळ यामुळे या वर्षी यात्रेला भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत होते . 

चैत्र पौर्णिमा उत्सव हा खंडेरायाचा महत्वपूर्ण मानला जातो. चैत्र शुद्ध पौर्णिमेला दुसऱ्या प्रहरी चित्रा नक्षत्र वसंत ऋतू या दिनी शिवशंकरांनी मार्तंड भैरव अवतार धारण केला. अशी आख्यायिका असल्याने येथे पुरातन काळापासून मोठी यात्रा भरते. राज्याच्या विविध प्रांतातील बहुजन बांधव व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने येथे दाखल होत येळकोट, येळकोट असा गजर करीत भंडाऱ्याची उधळण करत कुलधर्म -कुलाचार करतात. सालाबादप्रमाणे या वर्षीही उत्सव साजरा करण्यात आला. श्री मार्तंड देवसंस्थान व्यवस्थापनाकडून भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मल्हार गडावर सावलीचे आच्छादन करण्यात आले आहे. गडकोट आवारात थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्यभरातून आलेल्या भाविकांनी आपआपल्या देवघरातील मूर्ती, देवाचे टाक, आदी देवभेटीसाठी आणले होते. नाझरे जलाशयावर स्नान, कुलधर्म कुळाचार उरकून भाविक गडावर जावून देव दर्शन घेत होते. खंडेरायाचे मूळस्थान असलेल्या कडेपठार मंदिरामध्येही चैत्र षडरात्र निमित्ताने स्वयंभू लिंगावर दवण्याची पूजा करण्यात आली. पौर्णिमेचे औचित्य साधून नित्यनेमाची पूजा करताना सुगंधी  दवणा वनस्पतींने स्वयंभू लिंग आच्छादण्यात आले. जेजुरी गडावर आज पहाटे श्री खंडोबा मंदिर गाभाऱ्यामध्ये पहाटे भूपाळी झाले नंतर दवणा पूजा करण्यात आली. श्री मार्तंड देवसंस्थान तर्फे श्री हनुमान जयंती निमित्त  गडकोटामधील श्री जरांडेश्वर येथे विश्वस्त मंगेश घोणे यांचे हस्ते पूजन करण्यात आले व ग्रामस्थ, मानकरी, पुजारी सेवेकरी वर्ग, कर्मचारी वर्ग व भाविक भक्त यांनी सामूहिक मारुती स्तोत्र पठण केले. यावेळी विश्वस्त पांडुरंग थोरवे, अड विश्वास पाणसे आदी उपस्थित होते.
 
सुगंधी दवणा वनस्पतीचे महत्व 

कुलदैवत खंडेरायाच्या कुलधर्म -कुलाचार धार्मिक विधींमध्ये दवणा या वनस्पतीला मोठे महत्व आहे. दररोजच्या त्रिकाल पूजेमध्ये या सुगंधी वनस्पतींचा वापर केला जातो. तसेच दवणा अत्यंत सुगंधी व अतिशय थंड व गुणकारी समजली जाते. विशेष म्हणजे जेजुरी परिसरातच दवणा वनस्पतीचे उत्पन्न घेतले जाते. या वनस्पतीपासून अत्तरे, अगरबत्ती तयार केली जाते. मात्र डिसेंबर ते मार्च  या कालावधीत या वनस्पतीचे उत्पन्न घेण्यात येत असल्याने देवांच्या जत्रा यात्रा उत्सव काळात ती  हिरवी असते इतर काळात ती वाळवलेली भाविकांना उपलब्ध होते. 

Web Title: Yelkot Yelkot Jai Malhar The Bhandara is being opened thousands of devotees visit khandoba for the Chaitra Pournima Yatra in Jejuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.