घड्याळ आणि बसण्याची जागा ठरली शेवटची ओळख! अजितदादांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना मिळाली मोठी खूण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 10:45 IST2026-01-29T10:36:59+5:302026-01-29T10:45:10+5:30
विमानातील त्यांची बसण्याची जागा यावरून पोलिसांनी अजित पवार यांच्या पार्थिवाची ओळख पटवली आहे.

घड्याळ आणि बसण्याची जागा ठरली शेवटची ओळख! अजितदादांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना मिळाली मोठी खूण
Ajit Pawar Died in Plane Crash: बारामती विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव ओळखणे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. विमानाने पेट घेतल्यामुळे मृतदेहांची अवस्था अत्यंत विदारक झाली होती. मात्र, अजित पवारांच्या वक्तशीरपणाचे प्रतीक असलेले त्यांचे हातातील घड्याळ आणि विमानातील त्यांची बसण्याची जागा यावरून पोलिसांनी त्यांच्या पार्थिवाची ओळख पटवली आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांचा मोठा खुलासा
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी या शोधमोहिमेबाबत माहिती देताना सांगितले की, "अपघात इतका भीषण होता की विमानाचा कोळसा झाला होता. आमचे पथक घटनास्थळी दाखल झाले तेव्हा सर्व मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत होते. मात्र, अजित पवार यांच्या हातातील घड्याळाशी पोलीस कर्मचारी परिचित होते. त्या घड्याळावरून आणि विमानातील त्यांच्या विशिष्ट बसण्याच्या जागेवरून पोलिसांनी त्यांच्या पार्थिवाची ओळख पटवली आहे."
पार्थिव ओळखल्यानंतर अधिकृत पुष्टीसाठी पोलिसांनी डीएनए चाचणीसाठी नमुने घेतले आहेत. सध्या बारामती तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
व्हिडिओ झाला होता व्हायरल
अपघातानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये बचाव पथकातील एक व्यक्ती जळालेल्या मृतदेहाच्या हातातील घड्याळाकडे बोट दाखवून, हे पार्थिव अजित पवार यांचेच असल्याचा दावा करत होती. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीमुळे त्या दाव्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.
प्रवासाचा तो ३० मिनिटांचा थरार
अजित पवार यांचे चार्टर्ड विमान मुंबईहून सकाळी झेपावले होते. ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात त्यांच्या चार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. विमान हवेत झेपावल्यानंतर साधारण ३० मिनिटे सर्व काही सुरळीत होते. मात्र, बारामती धावपट्टीवर उतरताना झालेल्या अपघातामुळे विमानाने पेट घेतला आणि अवघ्या काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले.
आज बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज बारामती येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर बारामती शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण शहर शोकसागरात बुडाले आहे.