World BIodiversity Day : ' लॉकडाऊन' ठरतोय फायदेशीर ; तळजाई पाचगाव वनक्षेत्रात मोर, पक्ष्यांचा मुक्तसंचार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 11:48 IST2020-05-22T11:32:04+5:302020-05-22T11:48:05+5:30
लॉकडाऊनमुळे मिळाला निवांतपणा; नागरिकांची नाही वर्दळ

World BIodiversity Day : ' लॉकडाऊन' ठरतोय फायदेशीर ; तळजाई पाचगाव वनक्षेत्रात मोर, पक्ष्यांचा मुक्तसंचार !
श्रीकिशन काळे -
पुणे : पुणे शहर जीविधतेने (बायोडायव्हर्सिटी) नटलेले असून, येथे अनेक ठिकाणे याने संपन्न आहेत. त्यामुळे या लॉकडाऊनमध्ये सर्वच ठिकाणी चांगला परिणाम झाला असणार आहे. कारण तळजाई पाचगाव येथील वनक्षेत्रात तर पशू-पक्षी मुक्तसंचार करताना दिसून येत आहेत. एरव्ही रस्त्यावर न दिसणारे मोर देखील दिसत आहेत. विविध प्रकारचे पक्षी आढळत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात या लॉकडाऊनमुळे पाचगाव येथील या पशू-पक्ष्यांना चांगला दिलासा दिला आहे.
पुणे शहराला जीविधतेचा खूप मोठा वारसा लाभलेला आहे. जमिनीवरील परिसंस्था आणि जलीय परिसंस्था अशो दोन परिसंस्था येथे आहेत. शहरात वनस्पती, प्राणी, पक्षी, सरीसृप, कीटक, सूक्ष्मजीव इत्यादींची विविधता आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, फर्ग्युसन महाविद्यालय, विधी महाविद्यालय, भांडारकर संशोधन संस्था, बीएमसीसी महाविद्यालय, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी यासारख्या शैक्षणिक संस्थांसोबतच बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया, एम्प्रेस गार्डन, आघारकर संशोधन संस्था इत्यादी ठिकाणे जीविधतेने नटलेली आहेत. तसेच वेताळ टेकडी, चतृ:श्रृंगी टेकडी, वाघजाई, हनुमान टेकडी, पर्वती, रामटेकडी, बाणेर-पाषाण टेकडी इत्यादी टेकड्या हिरवाईने नटलेल्या आहेत. त्यात खूप जीविधता आहे.
जलीय परिसंस्थेत विविध प्रकारचे अधिवास दिसतात. शहरात मुळा नदी, मुठा नदी, राम नदी, आंबिल ओढा, भैरोबा नाला, नागझरी नाला, पाषाण तलाव, कात्रज तलाव आहेत. पावसाळ्यात अनेक ठिकाणी तळी निर्माण होतात. त्यातही जीविधता असते.
........................................
शहरातील जीविधता
वृक्षांची एकूण संख्या : ४१ लाख ९४ हजार ६२३
वृक्षांच्या एकूण प्रजाती : ४१८
सर्वाधिक संख्येची प्रजाती : गिरीपुष्प
सर्वात मोठे खोड असलेला वृक्ष : वड (१२०२ से. मी.)
दुर्मीळ वृक्षांची संख्या : १११
.................................
जीविधतेचा ऱ्हासाची कारणे
* नैसर्गिक क्षेत्रांचे औद्योगिक आणि निवासी क्षेत्रांत रूपांतर
* हानिकारक रासायनिक द्रव्ये वातावरणात मिसळल्याने जैविक विविधतेवर परिणाम
* प्राणी, पक्षी आणि औषधी वनस्पतींचा वारेमाप वापर
* बदललेली प्रवाह व्यवस्था आणि भक्ष-भक्षक संबंध
* जास्त काळ पेटवलेला वणवा काही प्रजाती नष्ट करतो
* विदेशी प्रजातींचे आक्रमण झाल्याने देशी प्रजाती होतेय कमी
* वातावरणातील बदल झपाट्याने होतात. त्याचा या निसर्गावर परिणाम होतो आणि अनेक प्रजाती नष्ट होतात.
..................................................
शहरातील दुर्मीळ आणि जुने वृक्ष जतन करण्याच्या हेतूने शहरातील विविध ठिकाणच्या वृक्षांवर हरितफलक लावले आहेत. नदीपात्रातील वाळुंज या दुर्मीळ वृक्षावर आणि अभिनव चौकातील गोरखचिंच येथेही लावला आहे.
जैविक विविधतेचे संवर्धन हे जैविक वारसा क्षेत्रे स्थापन करून देखील करता येते आणि याकरीता पुणे येथील गणेश खिंड उद्यान जीविधता वारसास्थळ म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याचे क्षेत्र ३३.०१ हेक्टर असून, यामध्ये महत्त्वपूर्ण नैसर्गिक लागवड केलेली जीविधता आहे. सुमारे १६५ रानटी वनस्पतींच्या जाती, ४९ पिकांच्या जाती, ४५३९ वृक्ष, २३ फळझाडे, ५७ बुरशींच्या जाती, २२ प्रकारचे सूक्ष्मजीव, ६ सस्तन प्राणी प्रजाती, १३ प्रकारच्या सरीसृप, ९५ पक्ष्यांच्या जाती, ७३ प्रकारच्या कीटक प्रजाती, बेडकांच्या ४ प्रजाती व कासवाचे अस्तित्व हे खरोखरच पुणे शहराच्या जीविधतेचे समर्थन करते.
तळजाई पाचगाव येथील जीविधता
विविध प्रकारच्या वनस्पती : ४०९
विविध प्रकारचे पक्षी : १३५
कोळी, विंचू : ९३
सस्तन प्राणी : २४
वन्यप्रजाती : ८०६