बांधकाम साईटवर जात असताना मानेत काच घुसली; पुण्यात कामगाराचा दुर्दैवी अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 20:34 IST2021-06-18T20:32:52+5:302021-06-18T20:34:56+5:30
विमाननगर येथील दुर्दैवी घटना; मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे गमावला जीव...

बांधकाम साईटवर जात असताना मानेत काच घुसली; पुण्यात कामगाराचा दुर्दैवी अंत
येरवडा - बांधकाम साइटवर काच घेऊन जात असताना झालेल्या अपघातात कामगाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. लोकेश शरद पाटे (वय 19, रा. न्यू मोदीखाना कॅम्प पुणे) याचा या अपघातात दुर्दैवाने मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर येथील एका खासगी बांधकाम साईडवर काचा बसवण्याचे काम सुरू होते. लोकेशसह इतर दोन कामगार काच घेऊन चालले होते. अचानक काचेला धक्का लागल्यामुळे काचेचा तुकडा लोकेश याच्या मानेत शिरला. उपचारासाठी एका टेम्पो मधून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून नेमका अपघात कसा झाला, तसेच त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण? हे अधिक तपासातच स्पष्ट होईल. त्यानुसार कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी दिली.
लोकेश अत्यंत गरीब कुटुंबातील कष्टाळू युवक होता. त्याच्या पश्चात आई, वडील,बहीण असा परिवार आहे. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मागील काही दिवसांपासून तो मजुरीचे काम करत होता. त्याच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूमुळे कुटुंबातील मोठा आधार गेला आहे. मोदीखाना लष्कर परिसरातील सामाजिक उपक्रमात त्याचा सहभाग होता. त्याच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईक व मित्र परिवार यांना मोठा धक्का बसला आहे.