पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागात भुयारी मार्गांची उभारणी प्राधान्याने करण्यात येणार असून, रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या येणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेकडून ठोस पावले उचलली जात आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्वरित करता येणाऱ्या उपाययोजना, दीर्घकालीन नियोजन या दोन्ही पातळ्यांवर काम सुरू आहे. रखडलेली रस्त्यांची कामे वेगात पूर्ण करणे, फुटपाथ अतिक्रमणमुक्त करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. येत्या वर्षभरात याचे सकारात्मक परिणाम नागरिकांना दिसून येतील, असे आश्वासन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांचा आढावा तसेच कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्यांची पाहणी आमदार हेमंत रासने यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली. यावेळी आयुक्तांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. पोलिस उपायुक्त झोन १ ऋषिकेश रावले, पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, घनकचरा विभागाचे संदीप कदम, पाणीपुरवठाचे नंदकुमार जगताप, महावितरणचे काकडे, कसबा मंडलाध्यक्ष प्रशांत सुर्वे, अमित कंक, छगन बुलाखे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार हेमंत रासने म्हणाले, कसबा मतदारसंघातील वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी भुयारी मार्गांच्या प्रस्तावावर राज्य सरकार सकारात्मक असून शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा भुयारी मार्गांचा प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आला आहे.
आयुक्तांचा रिक्षातून प्रवास
आमदार हेमंत रासने, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी पाहणी दौऱ्यावेळी कसबा मतदारसंघात रिक्षातून प्रवास केला. नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या.