इन्स्टाग्रामवरून झाली ओळख, महिलेने ठेवले तरुणाशी जबरदस्तीने शारीरिक संबंध
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 18:41 IST2021-08-14T18:38:59+5:302021-08-14T18:41:07+5:30
महिलेने साथीदारांमार्फत तरुणाला लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार समोर

इन्स्टाग्रामवरून झाली ओळख, महिलेने ठेवले तरुणाशी जबरदस्तीने शारीरिक संबंध
पुणे : इन्स्टाग्रामवरुन झालेल्या ओळखीतून एका महिलेने तरुणाला भेटायला बोलावले. त्याबरोबर जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर आपल्या साथीदारांमार्फत त्याला लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी न्यू पनवेल येथील एका ३१ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रगती नाव सांगणार्या महिलेसह तिच्या ३ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी तरुण व प्रगती असे नाव सांगणारी महिला यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर या महिलेने कोढव्यातील येवलेवाडी येथे या तरुणाला भेटायला बोलावले. त्यानुसार हा तरुण ७ ऑगस्ट रोजी तिला भेटायला पुण्यात आला. येवलेवाडी येथे या महिलेने त्याला जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्यास भाग पाडले. त्यानंतर फिर्यादी हा तेथून आपल्या कारमधून निघाला. वाटेत तिघांनी त्याला अडवून ते जबरदस्तीने कारमध्ये बसले. त्यांनी फिर्यादीला हाताने मारहाण केली. तसेच प्रगती या इस्टाग्राम आयडीवरील महिलेसोबत बलात्कार केला आहे. त्याची पोलिसांत खोटी तक्रार देण्याची धमकी दिली. पैसे दिले नाही तर या महिलेसोबत लग्न करावे लागेल, असे कागदावर लिहून घेतले. त्यावर फिर्यादीची सही व अंगठा घेतला. त्यानंतर फिर्यादी याच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी केली. तसेच फिर्यादीच्या खिशातील ५० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्यांच्याकडील एटीएम कार्डमधून जबरदस्तीने ३० हजार रुपये काढून घेतले. या घटनेने फिर्यादी तरुण घाबरुन जाऊन आपल्या घरी गेला होता. आरोपींकडून उर्वरित पैश्यांची मागणी होऊ लागल्याने त्याने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.\