दौंड : पाटस (ता. दौंड) गावच्या सरपंच तृप्ती भंडलकर यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ व्यापारी आणि ग्रामस्थांनी पाटस गाव बंद करून या घटनेचा निषेध केला. दरम्यान, या प्रकरणी आरोपी राजेश लाड याला अटक करण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सलीम शेख यांनी दिली.
या संदर्भात सरपंच तृप्ती भंडलकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की. अंबिकानगर परिसरात ग्रामपंचायतीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावर पाण्याचा टँकर चालक आदिनाथ यादव रस्त्याला पाणी मारत होता. यावेळी पाणी व्यवस्थित मारा असे मी टँकर चालकाला सांगत असताना परिसरातच असलेल्या राजेश लाड याने टँकर चालकाला रस्त्यावर पाणी मारण्यास मज्जाव केला. त्यानंतर मी स्वतः पाईपने पाणी मारायला सुरुवात केली तेव्हा राजेश माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या हातातून पाइप हिसकावून घेऊन मला ढकलून देत रस्त्यावर खाली पाडले.यावेळी माझी सासू अंजना राजेशला म्हणाल्या, तू माझ्या सुनेला खाली का पडलं? असे म्हणताच त्याने माझ्या सासूला धक्का देऊन खाली पाडले. या परिसरात उभे असलेले काही ग्रामस्थ आमच्या जवळ आले आणि राजेशला सांगितलं, भांडण करू नका. त्यानंतर सदरच्या घटनेची माहिती मिळताच माझे पती दादा भंडलकर घटनास्थळी आले तेव्हा माझ्या पतीलादेखील त्याने मारहाण केली. आणि टेम्पो चालू करून माझ्या पतीच्या अंगावर टेम्पो घातल्याने टेम्पोचा पुढचा भाग माझ्या पतीला लागून ते खाली पडले. असे सरपंच तृप्ती भंडलकर यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सरपंच तृप्ती भंडलकर यांना तसेच त्यांच्या पतीला आणि सासूला मारहाण केल्याच्या निषेधार्थ व्यापारी आणि ग्रामस्थांनी पाटस गाव बंद केले.