बापरे! गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची तब्बल दीड कोटीची फसवणूक
By नितीश गोवंडे | Updated: March 24, 2025 19:12 IST2025-03-24T19:11:28+5:302025-03-24T19:12:06+5:30
महिलेने पैसे गुंतविल्यानंतर सुरुवातीला काही रक्कम परताव्यापोटी देण्यात आल्याने महिलेचा विश्वास बसला होता

बापरे! गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची तब्बल दीड कोटीची फसवणूक
पुणे : शासकीय ठेक्यात गुंतवणुकीच्या आमिषाने एका महिलेची एक कोटी ४३ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सत्यम जोशी, देविका सत्यम जोशी, राहुल एरंडवणे, हर्षल चैाधरी, कुलदीप कदम आणि वैभव इंगवले अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार महिला खडकीतील औंध रस्ता परिसरात राहायला आहे. आरोपींशी त्यांची चार वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्यावेळी आरोपींनी आमच्या कंपनीला शासकीय कामाचा ठेका मिळाला आहे. या कामात गुंतवणूक केल्यास दरमहा सहा ते बारा टक्के व्याज देण्यात येईल, अशी बतावणी केली. त्यानंतर आरोपींनी महिलेकडून वेळोवेळी अशी १ कोटी ४३ लाख ७५ हजार रुपये घेतले. महिलेने पैसे गुंतविल्यानंतर सुरुवातीला काही रक्कम परताव्यापोटी देण्यात आली. त्यानंतर महिलेला परतावा देण्यात आला नाही.
परतावा न मिळाल्याने आरोपींकडे गुंतवलेली रक्कम परत मागितली. तेव्हा आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन चोरमले पुढील तपास करत आहेत.