Ajit Pawar: सोमवारपासून महाविद्यालये सुरु होणार; शहराबाहेरील विद्यार्थ्यांना RTPCR बंधनकारक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 19:23 IST2021-10-08T16:42:24+5:302021-10-08T19:23:08+5:30
पुणे : पुणे जिल्ह्यात येत्या सोमवार (दि. ११) पासून विद्यापीठ आणि महाविद्यालये सुरु करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांनी ...

Ajit Pawar: सोमवारपासून महाविद्यालये सुरु होणार; शहराबाहेरील विद्यार्थ्यांना RTPCR बंधनकारक
पुणे : पुणे जिल्ह्यात येत्या सोमवार (दि. ११) पासून विद्यापीठ आणि महाविद्यालये सुरु करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांनी दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. शहराबाहेरील किंवा परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कोरोना चाचणी (आरटीपीसीआर) करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही, असे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
विधान भवन येथे पुणे जिल्ह्याचा कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बाेलत होते. अजित पवार म्हणाले, की पुणे शहरात संपूर्ण जिल्ह्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. तसेच जिल्ह्याबाहेरीलही मोठ्या संख्येने विद्यार्थी मोठी महाविद्यालये आणि विद्यापीठात येतात. त्यामुळे त्यांनी दोन डोस घेण्याबरोबरच आरटीपीसार टेस्ट करणे बंधनकारक असणार आहे. अशा सूचना महाविद्यालये (कॉलेज) आणि वसतिगृहांना (हॉस्टेल) देण्यात आल्या आहेत.
महाविद्यालये पुन्हा गजबजणार
पुणे विद्यापीठाअंतर्गत पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात कला (आर्टस), वाणिज्य (कॉमर्स) आणि विज्ञान (सायन्स) शाखेचे तसेच इतर मॅनेजमेंट शाखेचे जवळपास ९०० महाविद्यालये आहेत. त्यामुळे येत्या सोमवारपासून पुन्हा ही सर्व महाविद्यालये विद्यार्थ्यांनी गजबजून जाणार आहेत.
विद्यापीशी संलग्न महाविद्यालयांची संख्या
पुणे : ३८८
अहमदनगर : १३१
नाशिक : १५८
विद्यापीठाशी संलग्न एमबीए इन्स्टिट्यूट : २०८
संशोधन संस्था: ९४
विद्यापीठाशी संलग्न एकूण महाविद्यालये संशोधन संस्था : ९८३
विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या एकूण विद्यार्थी संख्या : ६.५० लाख
खासगी कार्यालयांना १०० टक्के उपस्थितीस परवानगी
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील सर्व खासगी कंपनी, संस्था, कार्यालयांना यापुढे कर्मचाऱ्यांची उपस्थिती १०० टक्के ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केली.
येत्या सोमवारी महाराष्ट्र बंद
लखीमपूर येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्याची घटना काळीमा फासणारी आहे. या घटनेच्या निषेधार्थ येत्या सोमवारी (दि.११) महाराष्ट्र बंद पुकारला आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष सहभागी असणार आहे, असे पवार यांनी सांगितले.