ग्रामस्थांच्या मागण्या सरकारकडे पाठवणार, पुरंदर विमानतळाच्या संपादनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:33 IST2025-04-08T13:33:06+5:302025-04-08T13:33:12+5:30
विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, एखतपूर, कुंभारवळण, उदाचीवाडी, मुंजवडी, खानवडी, पारगाव या सात गावांमधील जमीन संपादित करण्यात येणार आहे

ग्रामस्थांच्या मागण्या सरकारकडे पाठवणार, पुरंदर विमानतळाच्या संपादनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
पुणे : पुंरदर विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींची संयुक्त मोजणी लवकरच होणार असून, त्यापूर्वी भूसंपादन अधिकारी ग्रामस्थांशी चर्चा करत आहेत. या चर्चांमधून त्यांच्या मागण्या राज्य सरकारकडे पाठविण्यात येतील. त्यानंतर भूसंपादनाला सुरुवात करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिली.
विमानतळासाठीपुरंदर तालुक्यातील वनपुरी, एखतपूर, कुंभारवळण, उदाचीवाडी, मुंजवडी, खानवडी, पारगाव या सात गावांमधील जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यापूर्वी संयुक्त मोजणी आणि ड्रोनद्वारे सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यापूर्वीच ग्रामस्थांनी जमीन देण्यास विरोध दर्शविला आहे. संपादनापूर्वी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. यात सरकारची भूमिका समजावून सांगण्यात येत आहे, तरीही शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी सासवड येथे उपोषण सुरू केले होते. पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी रविवारी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांची बाजू सरकारकडे मांडण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले.
त्यानंतर ग्रामस्थांचे शिष्टमंडळाने सोमवारी (दि. ७) जिल्हाधिकारी डुडी यांची भेट घेत त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. भूसंपादन प्रक्रियेबाबत सर्व माहिती व्हावी. कोणत्या गावात कधी ड्रोन सर्व्हे, मोजणी केली जाणार आहे याची माहिती सरकारने द्यावी. नंतर प्रक्रिया राबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यांचे गाऱ्हाणे ऐकल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सरकारकडे तुमची बाजू मांडू, अशा शब्दांत आश्वस्त केले.
विमानतळासाठी ड्रोन सर्व्हे, मोजणीची प्रक्रिया करण्यापूर्वी ग्रामस्थांना त्याची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यानंतरच प्रक्रिया सुरू केली जाईल. शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारकडे पोहचविण्यात येतील. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी.