राष्ट्रवादीचे भुज’बळ’ भाजपसोबत जाणार ? पुण्यातील वक्तव्याने राजकीय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:04 IST2025-01-31T16:04:18+5:302025-01-31T16:04:54+5:30
भुजबळ यांनी भाजपची उघड स्तुती केल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत

राष्ट्रवादीचे भुज’बळ’ भाजपसोबत जाणार ? पुण्यातील वक्तव्याने राजकीय चर्चा
पुणे - मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाजपबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना भुजबळ यांनी थेट भाजपच्या धोरणांचं समर्थन करताना “फुले-शाहू-आंबेडकरांना भाजप मान्य करायला लागला आहे, ओबीसींना ते सपोर्ट करत असतील तर मला काही अडचण नाही” असं विधान केलं.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित आठव्या युवा संसदेमध्ये २ रा संसद कट्टा अंतर्गत विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, लोकमतचे संपादक संजय आवटे यांनी पुण्यात आयोजित या कार्यक्रमात छगन भुजबळ यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. “तुफानांमध्ये जायचं आहे आणि लढायचं आहे… मी ठरवेन काय करायचं” असं म्हणत भुजबळ यांनी राजकीय भविष्यासंदर्भात मोठा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे भुज’बळ’ भाजपसोबत जाणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत.
भाजपसोबत काम करण्यास मला काहीच अडचण नाही, असं थेट सांगणाऱ्या भुजबळ यांनी मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणांवर सातत्याने नाराजी व्यक्त केली होती. अशातच आता त्यांनी भाजपची उघड स्तुती केल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत. राज्यातील आगामी राजकीय समीकरणांवर यामुळे मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. भुजबळांचा पुढील निर्णय कोणता असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.