पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मेला दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक शारीरिक छळ करून क्रूर वागणूक देऊन वैष्णवी हिच्या मृत्यूस कारणीभूत झाले आहेत, अशी तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.
वैष्णवीच्या वडील आनंद उर्फ अनिल साहेबराव कस्पटे (५१, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी याप्रकरणी १ ६ मेला बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वैष्णवी हिचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे, नणंद करीश्मा राजेंद्र हगवणे, दीर सुशील राजेंद्र हगवणे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सद्यस्थितीत पीडित महिलेची सासू, नवरा, नणंद यांना अटक करण्यात आली असून फरार असलेले दीर आणि सासरे राजेंद्र हगवणे यांचा शोध पोलिस घेत आहेत. आता या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली आहे. वैष्णवी हिला न्याय मिळेल यासाठी आयोग पाठपुरावा करेल असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.
पुणे जिल्ह्यात वैष्णवी हगवणे या महिलेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याची बातमी माध्यमांद्वारे समोर आली आहे. याची दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने बावधन पोलिसांना तत्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सद्यस्थितीत पीडित महिलेची सासू, नवरा नणंद यांना अटक करण्यात आली असून फरार असलेले दीर आणि सासरे राजेंद्र हगवणे यांचा शोध पोलिस घेत आहेत. यापूर्वीही महिला आयोग कार्यालयास याच कुटुंबातील एका महिलेने तक्रार अर्ज दिला होता. त्या अनुषंगाने पौड पोलीस स्टेशन येथे नियमानुसार कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले होते व त्याप्रमाणे पोलीस स्टेशन यांनीही कार्यवाही केली होती. दुर्दैवाने या पीडितेने मदत न घेता टोकाचे पाऊल उचलले. मृत वैष्णवी हिला न्याय मिळेल यासाठी आयोग पाठपुरावा करेल.