अनैतिक संबंधांच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून; मृतदेह गॅरेजमध्ये भट्टीत जाळला, पती गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 20:09 IST2025-11-08T20:08:28+5:302025-11-08T20:09:50+5:30
पत्नीचे एकाशी प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय पतीला असून समाजमाध्यमातील संवादावरुन त्याने आरोप केले होते. या कारणावरुन दोघांमध्ये वादही झाले होते

अनैतिक संबंधांच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून; मृतदेह गॅरेजमध्ये भट्टीत जाळला, पती गजाआड
नितीश गोवंडे
पुणे : अनैतिक संबंधांच्या संशयावरून महिलेचा गळा आवळून खून केल्यानंतर पतीने तिचा मृतहेद भट्टीत जाळला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने राख नदीत टाकून दिली आणि पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी याप्रकरणाचा सखोल तपास करुन खून प्रकरणाचा उलगडा केला. एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणे आरोपी पतीने पत्नीचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
अंजली समीर जाधव (३८, रा. श्री स्वामी समर्थ संकुल, एनडीए-वारजे रस्ता, शिवणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती समीर पंजाबराव जाधव (४२) याला अटक करण्यात आली. पत्नी अंजली ही २८ ऑक्टोबर रोजी वारजे परिसरातून बेपत्ता झाल्याची तक्रार आरोपी समीर याने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात दिली होती. याप्रकरणात कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी सखोल तपास करुन खून प्रकरणाचा उलगडा केला आणि आरोपी पती समीर याला अटक केली, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आरोपी समीर याचा शिवणे परिसरात फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे, त्याची पत्नी एका शाळेत नोकरीला होती. पत्नीचे एकाशी प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय समीरला होता. त्याने पत्नीच्या मोबाईलवरील मेसेजेसवरून पत्नीवर आरोप केले होते. या कारणावरून त्यांच्यात वादही झाले होते. त्यानंतर त्याने पत्नीचा खून करण्याचा कट रचला. त्याने मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील खेड शिवापूर परिसरातील शिंदेवाडी भागात गोडाऊन भाडेतत्त्वावर घेतले होती. त्यासाठी दरमहा १८ हजार रुपये भाडे ठरले होते. २६ ऑक्टोबर रोजी पत्नी वारजे पुलाखालून बेपत्ता झाल्याची तक्रार वारजे पोलिस ठाण्यात दिली होती. पत्नी बेपत्ता झाल्यानंतर समीर वारजे पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आला होता. ‘पत्नीचा शोध लागला का ?’ अशी विचारणा त्याने पोलिसांकडे केली होती. वारंवार चौकशी करणाऱ्या समीरच्या हालचाली पोलिसंनी टिपल्या होत्या. त्याचे वर्तन संशयास्पद वाटले होते. त्याने पोलिसांना दिलेल्या माहिती तफावत आढळून आली होती. पोलिसांनी ही बाब टिपली आणि त्याची चौकशी केली.
सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या समिरला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. २६ ऑक्टोबर रोजी समीर हा पत्नील फिरायला नेण्याच्या बहाणा करुन बाहेर पडला. त्याच्या कारने दोघे जण खेड शिवापूरजवळील मरीआई घाटात गेले. तेथून ते परतले. त्यानंतर खेड शिवापूर परिसरातील एका दुकानातून भेळ घेतली. रात्री एका ठिकाणी जेवण केले. त्यानंतर रात्री ८ ते ९ च्या सुमारास तो शिंदेवाडी परिसरातील भाडेतत्त्वावर घेतलेल्या गोडाऊनमध्ये तिला घेऊन गेला. तेथे, समिरने पुन्हा पत्नीशी भांडण्यास सुरूवात केली. त्यानंतर पत्नीचा हाताने गळा दाबून त्याने खून केला.
लोखंडी भट्टीत मृतदेह जाळला...
समिर याने या खुनाची महिन्याभरापूर्वीच तयारी केली होती. त्याने आधी शिंदेवाडी परिसरात गोडाऊन भाड्याने घेतले. त्यानंतर फॅब्रिकेशनचे चांगले ज्ञान असल्याने जाड पत्र्याच्या मदतीने त्याने एक भट्टी तयार केली. ती भट्टी गोडाऊनमध्ये नऊन, त्यात लाकडे भरली. पेट्रोल आणि काडीपेटी देखील आणून ठेवली. ठरल्याप्रमाणे तो अंजलीला तेथे घेऊन गेला. गळा दाबून मारल्यानंतर भट्टीत तिचा मृतदेह पेट्रोलच्या मदतीने जाळला. आग शांत झाल्यानंतर नंतर गोणीत राख भरली आणि ती जवळच असलेल्या नदीत टाकली. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी सकाळी तो पुण्यात आला. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी त्याने मिसिंगची तक्रार दिली.
मित्रालाच करायला लावला ‘आय लव्ह यू’ चा मेसेज..
आरोपी समीर याने त्याच्या एका मित्राला हैदराबाद येथे पाठवत तेथून स्वत:च्या पत्नीच्या मोबाईल नंबरवर ‘आय लव्ह यू्’ असा मेसेज करण्यास सांगितले. तसा मेसेज अंजलीच्या मोबाईलवर येताच, समिरने पत्नीच्या मोबाईलवरून ‘आय लव्ह यू टू्’ असा मेसेज त्या नंबरवर केला. त्यानंतर तो मेसेज वाचून तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्याचे नाटक करू लागला. दरम्यान, आरोपी समीर याचेच एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची बाब देखील पोलिस तपासात आली असून, त्याची कुणकुण त्याच्या पत्नीला लागल्याने समिरने पत्नीचा काटा काढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मुले नातेवाईकांकडे...
ऐन दिवाळीच्या दरम्यान समिरने हे कृत्य केले. समिर आणि अंजली यांना एक मुलगा व एक मुलगी असून, दिवाळीनिमित्त ते नातेवाईकांकडे गेले होते. त्यामुळे समीर एकट्या अंजलीला घेऊन घटनेच्या दिवशी फिरायला गेला होता. दरम्यान, पोलिस तपासात त्याने दृश्यम हा चित्रपट ४ महिन्यांपूर्वी ३ ते ४ वेळा पाहिल्याचे देखील पोलिसांना सांगितले.
या प्रकरणाचा तपास राजगड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, ही कामगिरी पोलिस उपायुक्त संभाजी कदम, एसीपी भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रकाश धेडे, नीलेश बडाख, उपनिरीक्षक संजय नरळे, नितीन गायकवाड, गणेश कर्चे, सुनील मुठे, योगेश वाघ, शरद पोळ आणि शिरीष गावडे यांनी केली.