पत्नीचे दुसरे लग्न; पहिल्या पतीने केला दुसऱ्या पतीचा खून

By नितीश गोवंडे | Updated: February 10, 2024 16:25 IST2024-02-10T16:24:55+5:302024-02-10T16:25:55+5:30

पत्नीशी दुसरे लग्न केल्याचा राग मनात धरून साथीदाराच्या मदतीने केला खून

wife second marriage The first husband killed the second husband | पत्नीचे दुसरे लग्न; पहिल्या पतीने केला दुसऱ्या पतीचा खून

पत्नीचे दुसरे लग्न; पहिल्या पतीने केला दुसऱ्या पतीचा खून

पुणे: पत्नीने दुसरे लग्न केल्याच्या रागातून माथेफिरू पहिल्या पतीने साथीदाराच्या मदतीने दुसऱ्या पतीच्या गळ्यावर वस्ताऱ्याने वार करुन खून केल्याची घटना बुधवार पेठेत घडली. ही घटना शुक्रवारी (दि. ९) रात्री साडेसातच्या सुमारास म्हसोबा मंदिराजवळील सार्वजनिक रस्त्यावर घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नईम अकबर शेख असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मयत व्यक्तीच्या २३ वर्षीय पत्नीने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून रुबेल उर्फ कलाम शैदुल शेख याला अटक केली आहे. तर अन्य एका अनोळखी व्यक्तीवर खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तो फरार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे दुसरे लग्न झाले असून मयत नईम शेख हे त्यांचे दुसरे पती होते. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी यांचे पती म्हसोबा मंदिरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर मुलीला फिरवत होते. त्यावेळी त्यांचा पहिला पती आरोपी रुबेल शेख व त्याचा साथीदार त्याठिकाणी आले.

नईम शेख याने फिर्यादी यांच्यासोबत दुसरे लग्न केल्याचा राग रुबेलच्या मनात होता. याच रागातून त्याने नईम यांच्या गळ्यावर वस्ताऱ्याने वार करुन खून केला. घटनेनंतर आरोपी पळून गेला. मात्र, फरासखाना पोलिसांनी घटना घडल्यानंतर काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत तर त्याचा साथीदार फरार झाला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दाढे करत आहेत.

Web Title: wife second marriage The first husband killed the second husband