...म्हणून पुण्यात होतोय लसीच्या सुयांचा तुटवडा; अजित पवारांनी सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 18:49 IST2021-10-01T18:47:58+5:302021-10-01T18:49:28+5:30
सीएसआरमधून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होत असल्याने सिरीजचा तुटवडा

...म्हणून पुण्यात होतोय लसीच्या सुयांचा तुटवडा; अजित पवारांनी सांगितलं कारण
पुणे : केंद्र सरकार बरोबरच सध्या मोठ्या प्रमाणात सीएसआरमधून जिल्ह्यासाठी लस उपलब्ध होत आहे. केंद्र शासन लसी सोबतच सिरीज पण उपलब्ध करून देते, पण सीएसआरमधून केवळ लसच उपलब्ध होत असून, सिरीजचा खर्च संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी करणे अपेक्षित आहे. यामुळेच आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकामध्ये सुयांचा तुटवडा जाणवत आहे. पण आता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सिरीज (सुया) खरेदी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा शुक्रवारी पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या आढावा बैठकीसाठी खासदार , आमदार आणि सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषद पवार यांनी वरील माहिती दिली.
''शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या, मृत्युदर कमी होत आहे. यामुळेच ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्यात आता केवळ एकच कोविड रुग्णालय ठेवून अन्य सर्व नाॅन कोविड रुग्णालये सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर शहरी भागात खाजगी हाॅस्पिटलवरील निर्बंध उठविण्यात आली असल्याचे पवार यांनी स्पष्ट केल.''
तीन सदस्यांचा प्रभाग निर्णय अंतिम
मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुकासाठी तीन सदस्यांचा प्रभाग असेल हा नियम निर्णय अंतिम आहे. आपली भूमिका दोन सदस्यांच्या प्रभागाची होती तीन सदस्यांचा प्रभाग झाला, ही तुमची माघार म्हणायची का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, माझे मत दोन सदस्यांचा प्रभाग असे होते, हे तुम्हाला कोणी सांगितले, माझ्या मनातलं तुम्हाला कळायला लागले की काय? राज्यात आम्ही महाआघाडी सरकार म्हणून तिन्ही पक्ष एकत्र बसून एक मताने हा निर्णय घेतला आहे. मला कितीही प्रभाग झाले तरी काही फरक पडत नाही, लोकांच्या मनामध्ये चांगल्या विकास कामाचा विश्वास निर्माण केला आहे.