.... कसं का असेना चार वेळा उपमुख्यमंत्रीपद पाहिले आहे : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 20:12 IST2020-01-18T20:02:31+5:302020-01-18T20:12:01+5:30
... त्यामुळे देशात,राज्यात बदनामी झाली. ती मी सहन करत पराभवाची जबाबदारीदेखील स्वीकारली....

.... कसं का असेना चार वेळा उपमुख्यमंत्रीपद पाहिले आहे : अजित पवार
बारामती : माझ्या १९९१ पासुन आजपर्यंतच्या राजकीय कार्यकाळात दोनवेळा माळेगाव कारखाना विरोधी विचारांच्या गटाकडे गेला.मात्र, त्याचा माझ्या खासदारकी,आमदारकीसह जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र, त्यामुळे देशात,राज्यात बदनामी झाली. ती मी सहन करत पराभवाची जबाबदारी देखील स्वीकारली. पण आम्ही देखील चार चार वेळा मुख्यमंत्रीपद आणि कसं का असेना चार वेळा उपमुख्यमंत्रीपद पाहिलेले आहोत अशी मिश्कीलपणे टिप्पणी करत अजित पवार यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. पवार यांच्या वक्तव्याला दादांनी भल्या सकाळी देवेंद्र फडवणीस यांच्याबरोबर घेतलेल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथेचे धागेदोरे होते. त्यामुळे पवार यांच्यासह उपस्थितांमध्ये हशा पिकला.
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी माळेगांव कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मताधिक्य मिळविण्यासाठी मनापासुन काम करावे,असे आवाहन पवार यांनी केले. माळेगावमध्ये सत्ताबदल झाल्यावर त्या काळात ८ ते ९ महिन्यात तीन तीन व्हाईस चेअरमन बदलण्यात आले.त्यावेळी त्यांचे बहुमत होते त्याबदद्ल मला टीका टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. त्यांच्या विचारांचे संचालक त्यांच्यापासुन बाजुला गेल्यावर त्यांना अपात्र करण्यात आले. लोकशाहीत हे बरोबर नाही.त्यांच्या विचारांचे सहकारमंत्री होते,म्हणुन असे राजकारण करण्यात आले. राज्याप्रमाणेच माळेगांव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सहकारी कारखाना निवडणुकीत महाविकासआघाडी पॅटर्न राबविण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. निवडणुकीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.