तुम्ही कशासाठी घराबाहेर पडता? पुणेकरांच्या लॉकडाऊनमधील समस्या जाणून घेण्यासाठी पोलिसांचा सर्व्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 20:35 IST2020-05-20T20:32:08+5:302020-05-20T20:35:43+5:30
रस्त्यावर विनाकारण फिरणार्यांची संख्या अजूनही मोठी..

तुम्ही कशासाठी घराबाहेर पडता? पुणेकरांच्या लॉकडाऊनमधील समस्या जाणून घेण्यासाठी पोलिसांचा सर्व्हे
पुणे : लॉकडाऊनच्या काळात शहरातील नागरिक कोणत्या कारणांसाठी सर्वाधिक वेळा घराबाहेर पडत आहे, त्या समस्या समजून घेऊन त्या कशा सोडवता येतील, याचा आराखडा तयार करण्यासाठी शहर पोलीस दलाकडून ऑनलाईन सर्व्हे केला जात आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूचा प्रसार कोणत्या मार्गाने कमी करता येईल
हे जाणून घेण्यासाठी हा सर्व्हे केला जात आहे.
लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी नागरिकांना घरात रहा असे आवाहन केले. केवळ अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दिवसातील काही वेळ सवलत दिली. वाहन वापरावर निर्बेध आणले, तरीही रस्त्यावरील व भाजी मार्केटमधील गर्दी कमी होताना दिसली नाही़. विनाकारण फिरणार्यांची संख्या अजूनही मोठी आहे. त्यामुळे नागरिकांच्या नेमक्या कोणत्या गरजा आहेत. ज्यासाठी ते जास्त वेळा घराबाहेर पडत आहे. ही गरज व त्यांच्या अडचणी कशा सोडविता येतील, हे जाणून घेण्यासाठी हा सर्व्हे घेतला जात आहे. या सर्व्हेत सहभागी होऊन विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे नागरिकांनी द्यावीत, असे आवाहन सोशल मिडियावर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
या सर्व्हेत कौटुंबिक माहिती विचारण्यात आली असून आपण काय आणण्यासाठी व किती वेळा घरातून बाहेर पडता. लॉकडाऊनच्या काळात आपल्याला कोणत्या अडचणी येत आहे. लॉकडाऊन/घरी जाणे / बाहेर जाणे इत्यादीमुळे आपण कोणत्या आव्हानांना सामोरे जात आहात? आपण पुण्यात राहत. ते ठिकाण, कोरोना विषाणूला नियंत्रित करण्यासाठी पोलीस अधिकारी यांना काही सूचना, राज्य / जिल्हा प्रशासनाला काही सूचना आणि पुणे पोलिसांची कोणती कारवाई/दृष्टीकोन तुम्हाला आवडला असे काही प्रश्न व आपली मते मागविण्यात आली आहेत.
https://twitter.com/PuneCityPolice/status/1262714137898971142?s=19
हा सर्व्हे मंगळवारपासून सुरु करण्यात आला असून नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नियमित मास्क व सॅनिटायझर वापरणे, सामाजिक अंतर पाळणे ही आता आपली जीवनशैली होणार आहे. या गोष्टी आपल्या दैनंदिन स्वभावात येणे गरजेचे आहे. त्यासाठी काय केले पाहिजे, हे समजून घेण्यासाठी हा सर्व्हे
मदत करणार आहे. डॉ. के़ व्यंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे