मराठा समाजाचे प्रश्न का चिघळले? त्यांची सत्ता असताना काय उपाययोजना केल्या? फडणवीस यांचे विरोधकांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 13:17 IST2025-09-02T13:16:17+5:302025-09-02T13:17:26+5:30
मराठा समाजाच्या आंदोलनात कधीही यापूर्वी असे झाले नव्हते परंतु, आता जे होत आहे, ते अतिशय निंदनीय आहे

मराठा समाजाचे प्रश्न का चिघळले? त्यांची सत्ता असताना काय उपाययोजना केल्या? फडणवीस यांचे विरोधकांना सवाल
पुणे : मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला कोर्टाच्या अटी, शर्तीनुसार परवानगी दिली होती. परंतु, आंदोलकांकडून रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने वागणूक सुरू आहे. याबाबत उच्च न्यायालयाने मुंबईत कोणाला येऊ देऊ नका, असे निर्देश राज्य सरकारला दिले असून, आंदोलकांच्या वर्तणुकीबाबत कोर्टाने नाराजी व्यक्त केली. याबाबत कोर्टाने काही निर्देश दिले असून, जे काही निर्देश आहेत, ते पालन करणे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे. प्रशासन त्या निर्देशांचे पालन करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. १) पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुणे मेट्रोच्या छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक ते शनिवार पेठ यांना जोडणाऱ्या पादचारी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर सगळ्या पर्यायांचा विचार करण्यात आला. आरक्षण कोर्टात कसे टिकेल, यावर चर्चा करण्यात आली. मात्र, महिला पत्रकारांचा विनयभंग हे कुठेतरी आंदोलनाला गालबोट लावल्यासारखे आहे. मराठा समाजाच्या आंदोलनात कधीही यापूर्वी असे झाले नव्हते. परंतु, आता जे होत आहे, ते अतिशय निंदनीय आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा कायद्याच्या अखत्यारीत असून, केंद्राच्या हातात नाही. पहिल्या दिवशी आंदोलकांनी जो काही धुडगूस घातला, त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती. त्यानंतर मग लगेच आम्हाला उपाशी ठेवल्याचा आरोप करण्यात आला. पण तसे काही नव्हते, काही लोकांनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला होता म्हणून दुकाने बंद करण्यात आली होती. आम्ही व्यापाऱ्यांना सांगितले की, इथे पोलिस संरक्षण देऊ, तुम्ही दुकाने उघडी ठेवा. आता दुकाने उघडी आहेत.
राजकीय पोळी भाजणे बंद करा
खासदार सुप्रिया सुळेंसह सर्व राजकीय नेत्यांना माझी विनंती आहे की, सामाजिक प्रश्नांवर राजकीय पोळी भाजणे बंद केले पाहिजे. कारण, त्यामुळे आपलेच तोंड पोळते. मराठा समाजाचे प्रश्न का चिघळले? त्यांची सत्ता असताना त्यांनी मराठा समाजासाठी काय उपाययोजना केल्या? २०१९ नंतर पुन्हा अडीच वर्षे त्यांची सत्ता होती. यावेळी एकही प्रश्न मराठा समाजाच्या बाजूने घेतले नाहीत. जे काही निर्णय घेतले ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी घेतले आहेत, असे फडणवीस म्हणाले.